पिस्तुल विकणार्‍या युवकाला अटक


कराड : पिस्तुल विकण्याच्या उद्देशाने आलेल्या युवकास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तुल जप्त केले आहे. डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तासवडे टोलनाका (ता. कराड) येथे गुरूवार दि. 1 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. 

या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यामध्ये आणखी एकाचा सहभाग असल्याचे चौकशीत समोर आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.प्रशांत संजय थोरात (वय 26, रा. पाटील गल्ली, उंब्रज, ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तर सोमनाथ पाटोळे (रा. काशिद गल्ली, उंब्रज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुसर्‍या संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, डीवायएसपी नवनाथ ढवळे यांना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत तासवडे टोलनाक्याजवळ गुरूवारी एकजण पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलिस कर्मचारी तासवडे टोलनाक्याजवळ हॉटेल चुलांगणसमोर पोहोचले. तेथे पोलीस सापळा रचून दबा धरून बसले. त्यावेळी एकजण चालत येऊन तेथे थांबला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता खिशात गावठी बनावटीचे पिस्तुल व काडतुस आढळून आले.

त्यानंतर संबंधिताला पोलिसांनी नाव विचारले असता त्याने प्रशांत संजय थोरात असे सांगीतले. तसेच उंब्रजमधील सोमनाथ पाटोळे याने पिस्तुल विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगत त्याचे 5 हजार तो देणार असल्याचेही पाटोळे याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत थोरात व सोमनाथ पाटोळे या दोघांवरही गुन्हा दाखल केला असुन प्रशांत थोरात याला अटक केली आहे. तर सोमनाथ पाटोळे याचा पोलिस शोध घेत आहेत.

डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शेलार, पो. ना. पवार, पो. कॉ. सागर बर्गे, पाटील, कांबळे, कोळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. याबाबत तळबीड पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

No comments

Powered by Blogger.