आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

किसनवीरांनी येरवडा तुरुंग फोडल्याचा अमृतमहोत्सव


सातारा : चले जाव चळवळीचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या चळवळीदरम्यान सातारा जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशभक्त किसनवीर यांनी त्यांच्यासह पाच सहकार्‍यांनी येरवडा कारागृहातून पलायन केले. या घटनेला येत्या दि. 1 नोव्हेंबर रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गुरूवारी दुपारी 12.30 वाजता सातारा येथील हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती स्वातंत्र्य सैनिक पतंगराव फाळके व विद्रोही चळवळीचे उपाध्यक्ष विजय मांडके यांनी दिली.जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून कॉ. किरण माने हे प्रमुख वक्‍ते असणार आहेत.

भूमिगत चळवळीने देशात इंग्रज सरकारला हादरून सोडले होते. इंग्रज सरकारने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना वेगवेगळ्या तुरुंगात अटक करून ठेवले होते. सातारा जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक किसनवीर व त्यांच्या सहकार्‍यांना 18 सप्टेंबर 1942 रोजी अटक करुन येरवडा कारागृहात ठेवले होते.

भूमिगत आंदोलन सुरू ठेवावे यासाठी किसनवीर यांची इच्छा होती. त्यासाठी ते तुरुंगातुन निसटून जाण्याची संधी पहात होते. तुरुंगाच्या पहारेकर्‍याला डॉ. तुळपुळे यांनी फितूर केल्याने पोलिसांना चुकवून किसन वीर यांनी आपले सहकारी स्वातंत्र्य सैनिक छन्नुसिंग चंदेले, पांडुरंग गणपती पाटील ऊर्फ पांडू मास्तर, भाई ल.पै. विभुते आणि बलदेव प्रसाद यांच्यासह येरवडा जेलच्या भिंतीवरून उड्या मारुन पलायन केले होते.

कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्यप्रेमी नागरिक व युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.