Your Own Digital Platform

लोणंदमधील २४ वर्षांचे महिलाराज संपुष्टात


लोणंद : लोणंद नगरीच्या राजकीय इतिहासातील 1994 ते 2018 अशा तब्बल 24 वर्षांचे महिलाराज संपुष्टात आले आहे. 1994 नंतर ग्रामपंचायतीच्या सरपंच व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा कारभार आज सचिन शेळके स्वीकारणार आहेत. 24 वर्षांच्या कालावधीत सहा महिलांनी हे पद सक्षमपणे सांभाळले. त्यानंतर आता प्रथम नागरिक म्हणून पुरूष आणि तोही सर्वांत तरुण नगराध्यक्ष होण्याचा मान शेळके यांना मिळाला आहे.1994 साली लोणंदच्या तत्कालीन उपसरपंच अ‍ॅड. माया खरात यांना प्रभारी सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. 

त्यानंतर 1995 साली मालन क्षीरसागर यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळली होती तर 1997 साली कमल भंडारी यांना 5 वर्षे सरपंच पदावर काम करण्याची संधी मिळाली होती. 2002 साली सरपंच म्हणून नंदा गायकवाड यांना मिळाली होती. 2007 साली देवकीबाई डोईफोडे यांनी तर 2012 साली सरपंच म्हणून स्नेहलता शेळके - पाटील यांना काम करण्याची संधी मिळाली. यानंतर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. त्यामुळे लोणंदच्या नगराध्यक्ष म्हणून स्नेहलता शेळके - पाटील यांना प्रथम संधी मिळाली. त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तब्बल 24 वर्षांनंतर लोणंदमध्ये महिला राजला ब्रेक मिळाला आहे.

सचिन शेळके यांचा सामान्य शेतकरी कुटूंंबातील साधा ट्रॅक्टर चालक ते नगराध्यक्ष असा प्रवास निश्‍चितच कौतुकास्पद असा आहे. त्यांना अडीच वर्षांपूर्वी मिळालेली संधी भाऊबंदकीच्या प्रेमामुळे निघून गेली होती. पण त्यांना पुन्हा संधी मिळाली आणि महिलाराजला ब्रेक मिळाला.