क्षेत्र मोर्वे येथे सद्गुरु चिले महाराज रथाचे उत्साहाश्रीत स्वागत
फलटण ः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, चिलेश्‍वराच्या रथासंगे निघू चला मोर्वे गावाला, म्हणत म्हणत श्री क्षेत्र जेऊर (पैजारवाडी) येथून निघालेल्या रथ सोहळ्याचे टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो भक्तांच्या अलोट भक्तीसागरासह श्री क्षेत्र मोर्वे येथे आगमन झाले.

श्री सद्गुरु चिले महाराज यांनी 26 जानेवारी 1984 रोजी मोर्वे गावात पहिले पाऊल ठेवले होते. तेव्हापासून हा दिवस भक्तगण आगमन दिन म्हणून साजरा करतात. त्यानिमित्त 15 जानेवारी रोजी श्री क्षेत्र जेऊर (पैजारवाडी) येथून पालखी रथ सोहळ्याचे प्रस्थान होऊन दि. 26 जानेवारी रोजी पालखी रथ सोहळा मोर्वे गावी पोहचतो. त्यानंतर रथाची भव्य मिरवणूक काढण्यात येते. दि. 26 जानेवारी रोजी रथ सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर भक्तगणांनी मोठ्या उत्साहात स्वागत करुन घोडे, उंट, बँड, झांज पथकाच्या ताफ्यासह फुलांनी व नोटांनी सजवलेल्या रथातून महाराजांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. पालखी रथ सोहळा व सहभागी वारकर्‍यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी स्वागत कमानी, गुड्या, तोरणे बांधून, रांगोळी घालून पालखी रथाचे उत्स्फूर्त स्वागत केले.

यावेळी दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पालखी रथ सोहळा दत्त मंदिरामध्ये आल्यानंतर आरती, भजन होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानिमित्त ढोल, लेझीम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या संघांना मा.आ.प्रकाश देवळे, निखील हिंगमिरे, विश्‍वस्तांसह व मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.