न्यू फलटणच्या जमिनीचा लिलाव बोली अभावी स्थगित
फलटण : न्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी ता. फलटण या साखर कारखान्याकडील ऊस उत्पादक शेतकर्यांची सुमारे 50 कोटी रुपयांची देणी देण्यासाठी कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेवून त्यापैकी 5 हेक्टर 87 आर जमिन लिलावाने विकण्यासाठी सोमवार दि. 28 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय फलटण येथे जाहीर लिलावाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र बोली बोलण्यास कोणीही उपस्थित न राहिल्याने लिलाव प्रक्रिया स्थगित करण्यात आाली असून सदर जमिनीचा फेर जाहीर लिलाव काढण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत समजलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने केवळ 15 एकर क्षेत्राची जाहीर लिलावाने विक्री करुन सदर जमीन एकाकडे आणि पुन्हा कारखाना व अन्य मालमत्ता अन्य लिलाव प्रक्रियेद्वारे दुसर्याकडे गेल्यास कोणालाही सोईचे होणार नसल्याची चर्चा असून प्रशासनाने कारखाना व ताब्यात घेतलेली संपूर्ण मालमत्ता एकाचवेळी जाहीर लिलावाने विक्री केल्यास बोली बोलण्यासाठी लोक पुढे येवू शकतील अशी अपेक्षा व्यक्त झाली. मात्र त्याबाबत कोणीही अद्याप प्रशासनाला स्पष्टपणे काहीही सांगितल्याचे समजले नाही. प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याबाबत संदीग्धता असल्याने आगामी काळात कोणता निर्णय होतो याची वाट पहावी लागणार आहे.

न्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी या कारखान्याकडे गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसापैकी 47 कोटी 86 लाख 98 हजार रुपये आणि त्यावरील व्याज ऊस उत्पादक शेतकर्यांना अद्याप दिले नसल्याने शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी सदर कारखान्याची स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करुन ऊस उत्पादकांची देणी या मालमत्तेच्या विक्रीतून देण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांना दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने याकामी फलटणचे उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांना याबाबतचे अधिकार देवून सदर मालमत्ता जप्त करुन त्यावर ऊस उत्पादकांची वरील देणी जमीन महसूलची थकबाकी समजून वसूल करण्याचे निर्देश दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांनी केलेल्या कार्यवाहीतून कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेवून त्यावर ऊस उत्पादकांची देणी जमीन महसूलाची देणी म्हणून नोंदविली आहेत. कारखान्याच्या ताब्यात घेतलेल्या मालमत्तेपैकी 5 हेक्टर 87 आर जमिनीची सोमवार दि. 28 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय फलटण येथे जाहीर लिलावाने विक्री करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार पिंपळवाडी ता. फलटणच्या हद्दीतील भूमापन क्रमांक 62/1, 62/2, 62/3/अ, 62/4, 62/5/अ, 62/8/अ अशी एकुण 5 हेक्टर 87 आर म्हणजे सुमारे 15 एकर बागायत शेतजमीन 15 कोटी 55 लाख 55 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीस विकली जाणार नसल्याचे स्पष्ट करीत या क्षेत्राच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सोमवार दि. 28 रोजी सुरु केली मात्र कोणीही बोली बोलण्यास आले नसल्याने सदरची प्रक्रिया स्थगीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

No comments

Powered by Blogger.