Your Own Digital Platform

फलटण एस. टी. स्टँड कात टाकणार काँक्रीटीकरणासाठी 1 कोटी हून अधिक मंजूर

फलटण ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) फलटण आगारांतर्गत फलटण बसस्थानक वाहनतळाच्या काँक्रीटीकरणासाठी 1 कोटी 15 लाख 70 हजार 151 रुपयांच्या निविदेतील अंदाजपत्रकापेक्षा 17% कमी दराची मे.सिनर्जी स्काय इन्फ्रा डेव्हलपमेंट या कंपनीची निविदा मंजूर झाली असून लवकरच सदरच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरु होईल अशी अपेक्षा महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

फलटण बसस्थानकाची इमारत सुमारे 60/62 वर्षापुर्वी उभारण्यात आली असून त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे काही सुधारणा करण्यात आल्या असल्या तरी 60/62 वर्षातील वाढती प्रवाशी संख्या, वाढत्या बसेसच्या प्रमाणात या बसस्थानकावर प्लॅटफॉर्म व अन्य सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री ना.देेवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बसस्थानकाच्या सुधारणेबाबत सातत्याने पाठपुरावा करुन बसस्थानकावर नवीन 11 प्लॅटफॉर्म, स्थानक प्रमुख, वाहतूक नियंत्रक, आरक्षण विभाग वगैरेसाठी स्वतंत्र कक्षांची निर्मिती, बसस्थानकावर वृत्तपत्र व जनरल स्टोअर्स तसेच कॅन्टीनसाठी स्वतंत्र दालने निर्माण करण्यात आली आहेत. त्याचबरोबर बसस्थानकातून बाहेर पडणार्या व बसस्थानकामध्ये येणार्या फलटण आगार व बाहेरील आगारांच्या बसेसची दररोज सुमारे 350 फेर्यांची संख्या लक्षात घेता या सर्व बसेस बसस्थानकासमोरील रस्त्यावर ये-जा करण्यासाठी आल्याने वाहतूकीला होणारा अडथळा लक्षात घेऊन बसस्थानकाची इन व आऊट गेट बसस्थानकाच्या पुर्वेस असलेल्या रिंगरोडवर घेण्यासाठी एस.टी.च्या अधिकार्यांना प्रत्यक्ष जागेवर आणून त्याबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर बसस्थानकाच्या पुर्वेस असलेली खाजगी गॅरेजेस तेथून हलवून त्यांना फलटण-लोणंद रस्त्यावर रानडे पेट्रोलपंपाशेजारी स्वतंत्र जागा व वीज, पाणी, रस्ता वगैरे सुविधा उपलब्ध करून देवून त्यांच्यासाठी स्वतंत्र गॅरेज लाईन निर्माण करुन देण्यात आली आणि बसस्थानकातील बसेस बाहेर पडण्यासाठी व बाहेरील आत येण्यासाठी रिंगरोडवर मोठे गेट उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वाढत्या प्रवाशी संख्येला पुरेशा बसेस उपलब्ध करुन देण्याबरोबर या सर्व प्रवाशांना बसस्थानकावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सतत पाठपुरावा केला असल्याने लवकरच फलटणचे एस.टी. बसस्थानक सुसज्ज स्वरुपात उभे राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बसस्थानकाच्या काँक्रीटीकरणासाठी 1 कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध झाल्याने आता हे बसस्थानक खर्या अर्थाने सुसज्ज आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणारे बसस्थानक म्हणून नावारुपास येईल अशी अपेक्षा प्रवाशी वर्गातून व्यक्त होत आहे.