Your Own Digital Platform

...तर 12वी परीक्षेच्या काळात शिक्षकांचा असहकार!

मुंबई: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य केल्यानंतर सरकारनं दिलेली आश्वासनं अद्याप पाळलेली नाहीत. येत्या 20 तारखेपर्यंत आश्वासनांची पूर्तता केली नाही तर 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या 12 वी परीक्षेच्या काळात ’असहकार’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं दिला आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं विविध मागण्यांसाठी राज्यभरात मूक मोर्चे काढले. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत 31 जानेवारी बैठक झाली. त्यात शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यासंबंधीचा शासन निर्णय दहा दिवसांत जाहीर करण्याचे आश्वासन दिले. अर्थमंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन त्यांच्याशी संबधित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचेही ठरले होते. त्यात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान विषयास अनुदान देणे, 24 वर्षांच्या सेवेनंतर सर्व शिक्षकांना निवड श्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांनाही राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे 10 ,20 व 30 वर्षांच्या सेवेनंतर आश्वसित प्रगती योजना लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून तातडीने आयोगाच्या शिफारशी लागू करणे या मागण्यांचा समावेश होता. विद्यार्थी हितासाठी आणि शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन संघटनेने असहकार आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. त्यामुळं प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षाही सुरळीतपणे पार पडल्या होत्या. मात्र, दिलेली आश्वासने हवेत विरली. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी आहे, असं महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले. येत्या 20 तारखेपर्यंत सरकारने आश्वासनांची पूर्तता न केल्यास 21 फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.