टूजी प्रकरण: निर्दोषमुक्त करण्यात आलेल्यांना 15 हजार रोपे लावण्याचे आदेश

वृत्तसंस्था: टूजी घोटाळा प्रकरणातून निर्दोषमुक्त करण्यात आलेल्या दोन व्यक्ती आणि तीन कंपन्यांना प्रत्येकी तीन हजार वृक्ष लावण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या मुक्ततेच्या आदेशाला दिलेल्या आव्हानाबाबत म्हणणे मांडण्यासाठी या व्यक्ती आणि कंपन्यांनी अधिक मुदत मागितल्याने न्यायालयाने ही शिक्षा दिली आहे.

स्वान टेलिकॉम प्रा. लि.चे प्रवर्तक शाहीद बलवा, कुसेगाव फ्रुट्स अ‍ॅण्ड व्हेजिटेबल्स प्रा. लि.चे संचालक राजीव अग्रवाल यांच्यासह डायनामिक रिअल्टी, डी. बी. रिअल्टी आणि निहार कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपन्यांना न्या. नाजमी वझिरी यांनी म्हणणे मांडण्यासाठी अखेरची एक मुदत दिली होती.

ईडीच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणातून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकच्या खासदार कनिमोळी, बलवा आणि अग्रवाल त्याचप्रमाणे अन्य तीन कंपन्या यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. दिल्लीच्या दक्षिणेकडील परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी 15 फेब्रुवारी रोजी वनाधिकार्‍यासमोर हजर राहावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. कंपन्यांचे प्रतिनिधित्व अधिकृत स्वाक्षरीधारकांनी करावयाचे आहे.

No comments

Powered by Blogger.