Your Own Digital Platform

2009 ची पुनरावृत्ती होणार : सुभाष शिंदे

स्थैर्य, फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुप्रीमो खासदार शरद पवार साहेब निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणुकीबाबत माझा व शरद पवार यांचा दूरध्वनीवरून संपर्क झाला आहे. माढ्याबाबत पक्षाकडून लवकरच अधिकृत घोषणा होईल. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यानंतर 2009 सालची पुनरावृत्ती होईल यात कोणतीही शंका नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी दैनिक स्थैर्यशी व्यक्त केले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांना आपण स्वतः माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली. मोहिते पाटील यांनी मागणी केल्यानंतर पक्षातील सर्वच मंडळीनी पवार साहेब आम्ही आपले सर्व म्हणणे ऐकतो आपणही आमचे म्हणणे ऐकावे अशी भूमिका पवार साहेबांसमोर व्यक्त केली. आमच्या सर्वांच्या मागणी मान्य करून शरद पवार हे माढा लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे, असे शिंदे म्हणाले.

शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिल्यानंतर त्यांना पूर्वी पेक्षा जास्त मतांनी आपण निवडून देवू. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते अहोरात्र काम करतील यात शंका नाही असेही सुभाष शिंदे यांनी स्पष्ट केले.