वर्ल्ड कप2019: वर्ल्ड कप: ’या’ खेळाडूंमध्ये शर्यत
चेन्नई: वर्ल्डकप स्पर्धेला काही दिवसच उरले आहेत आणि भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशात संघातील मधल्या फळीविषयीची चिंता निवड समितीला सतावते आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा डाव 92 धावांत आटोपल्यानं ती आणखी वाढलीय.आता मधल्या फळीत कुणाला खेळवावं असा प्रश्‍न निवड समितीला पडला असून, संघात स्थान पक्कं करण्यासाठी अंबाती रायुडू, हार्दिक पंड्या, केदार जाधव, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत यांच्यात चुरस आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात रायुडूनं 90 धावांची खेळी करून भारतीय संघाला तारलं. पण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येईल, या प्रश्‍नाचं उत्तर मिळू शकलं नाही. रोहित आणि धवन या सलामीच्या जोडीनं सातत्य दाखवलं नसलं तरी, त्यांचं स्थान पक्कं मानलं जातंय. कर्णधार विराट कोहली तिसर्‍या आणि महेंद्रसिंग धोनी पाचव्या स्थानी फलंदाजी करतील, हे निश्‍चित आहे. अशात चौथ्या आणि सहाव्या क्रमांकावर कोण मैदानात उतरेल हा निवड समितीसमोरचा जटील प्रश्‍न आहे. 90 धावांची खेळी करून रायुडूनं या जागेवर कोण याचं उत्तर दिलं आहे. पण केदार जाधवनंही ’मलिंगा स्टाइलनं’ ऑफ स्पिन गोलंदाजी आणि दबावात फलंदाजी करण्याची क्षमता दाखवली आहे. त्यामुळं सहाव्या क्रमांकासाठीची शर्यत आणखी वाढली आहे. रायुडू चौथ्या आणि केदार सहाव्या क्रमांकासाठी ’फिट’ आहेत, असं मानलं तरी बॅकअपचा विचार केला जात आहे. निवड समितीचे माजी प्रमुख किरण मोरे यानंही बॅकअपची गरज असल्याचं मत ’टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना व्यक्त केलं. मात्र, भारतीय चमूत अजिंक्यला स्थान मिळावं, असं माजी क्रिकेटपटू वेंगसरकर यांना वाटतं. प्रत्येक सामन्यात त्याला खेळवावं असं माझं मत नाही. पण ऐनवेळी भारतीय संघाला तारणारा फलंदाज हवा आहे आणि अजिंक्य हाच पर्याय आहे, रहाणे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, असंही ते म्हणाले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सातव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडूची कमी जाणवली. हार्दिक पंड्यावर बंदी घालण्यात आली होती आणि विजय शंकरनं खास अशी कामगिरी केली नाही. पण बंदी उठल्यानंतर हार्दिकला न्यूझीलंडला बोलावलं आणि त्यानं अखेरच्या सामन्यात 22 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी, दोन गडी बाद करून आपल्याला पर्याय नाही, हे दाखवून दिलंय. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा एक पर्याय आहे. त्याला संधी मिळाली पाहिजे, असं काहींचं मत आहे. वेंगसरकर यांचं मात्र वेगळं मत आहे. विजय शंकरला संधी मिळायला हवी. केदार जाधव हा स्पिनर म्हणून पर्याय असताना आणखी एका स्पिनरची गरज वाटत नाही. विजय शंकर चांगली फलंदाजी करू शकतो आणि इंग्लंडमध्ये त्याची गोलंदाजीही मदतगार ठरू शकते, असं ते म्हणाले.

संघात आणखी एका विकेटकीपरची जागा आहे. व्यवस्थापनानं दिनेश कार्तिकला संधी दिली आणि त्यानंही महत्वाच्या क्षणी चांगली कामगिरी करून लक्ष वेधून घेतलं. रिषभ पंतचंही नाव समोर येतं. त्यानंही फटकेबाजी करून लक्ष वेधून घेतलंय, पण सध्या तरी या शर्यतीत दिनेश कार्तिक आघाडीवर आहे.

No comments

Powered by Blogger.