Your Own Digital Platform

बेकायदा वाळू वाहतूक; 31 लाखांचा मुद्देमाल जप्त
औंध: चोराडे फाटा ते रायगाव रस्त्यावर बेकायदा वाळू वाहतूक करणार्या दोन ट्रकवर औंध पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत वाळूसह सुमारे 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास औंध पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी चोराडे फाटा येथे पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, मायणी येथील नदीपात्रातून बेकायदा वाळू भरून कराडकडे निघालेल्या ट्रक क्रमांक (एम एच 50 2107) चे दोन ट्रक आढळून आले. या ट्रकवर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दोन्ही ट्रकसह वाळू जप्त केली. ट्रक चालक भीमाशंकर चव्हाण (वय 29, रा.हिपनाळ हिटगी ता.सिंदगी जि.विजापूर, सध्या रा. सैदापूर, ता.कराड) गोपाळ बन्नेनवर (वय 23, रा.गोवारे ता.कराड) यांच्यासह ट्रकमालक अमोल बाळासो देशमुख (रा.गोवारे) यांच्या विरुद्ध बेकायदा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईत दोन ट्रक व दहा ब्रास वाळू असा सुमारे 30 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात प्रशांत पाटील यांनी फिर्याद दिली. तपास सपोनि सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

दोन्ही ट्रकचे नंबर ‘सेम टू सेम’

शनिवारी औंध पोलिसांच्या पथकाने कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक करणार्या दोन ट्रक चालकांसह 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही ट्रकचे नंबर सेम टू सेम असल्याने पोलिसांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ट्रकचे नंबर एकसारखेच असून पोलिसांना चकवा देण्यासाठी तसेच कारवाई टाळण्यासाठी गाडी मालकाने नामी शक्कल लढवल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही वाहनांचा रंग एक, बॉडी बांधणी एकसारखी असल्याने वाळू वाहतूकदारांच्या या चलाखीने पोलिस ही अवाक् झाले आहेत.