ग्रामीण महिलांसाठी जिल्ह्यात 43 बँक सखी

संग्रहित छायाचित्र

सातारा : महिलांना गरिबीतून बाहेर काढून त्यांना बँकेतील आर्थिक व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने 11 तालुक्यात 43 बँक सखी म्हणून महिलांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या बँक सखी ग्रामीण भागातील महिलांना बँकिंग सुविधा देणार असल्याने महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

बँक सखी योजना ही स्वयंसहाय्यता समुहातील बँक संबंधीत कामामध्ये योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देण्यासाठी उचललेले एक मोठे पाऊल आहे. जिल्ह्यातील डांगरेघर, पवारवाडी, बुध, शिरसवाडी, ताथवडा, शेंदुरजणे, अंदोरी, पांढरेचीवाडी, भुईंज, चिमणगाव, ढेबेवाडी, गोंदवले खु., सैदापूर, गोळेश्‍वर, आसरे, तामकडे, कुडाळ, पाडेगाव, सोनवडे, वडजल, सायळी पु., गोडवली, केर, पिंपोडे बु., निढळ, साखरवाडी, आनेवाडी, तळमावले, विहे, उंब्रज, टाळगाव, अंबवडे, वरकुटे मलवडी, नागेवाडी, शाहूपुरी, वर्णे, नरवणे, एकसर, निगडी, वडोली निळेश्‍वर, तापोळा,जिंती, पोतले आदी 43 ठिकाणी बँक सखी बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, आयडीबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या बँकांचे कामकाज पाहणार आहेत. या बँक सखींना बँकेमार्फत बँकींग व्यवहाराबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बँक सखीची नेमणूक केल्यानंतर सखींनी नेमून दिलेल्या भागात बँकेच्या शाखेत समुहासाठी व समुदायासाठी माहिती कक्ष संभाळावा. समुहाचे व संघाचे नवीन खाते उघडावे, समुहातील महिलांना व बँक अधिकार्यांना कागदोपत्री व्यवहारात मदत करावी. कर्ज प्रकरणासाठी मार्गदर्शन व पाठपुरावा करावा. समुहांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा वेळोवेळी मागोवा घेणे, इतर आर्थिक समावेशन गतीविधी राबविणे, कर्जासाठी सल्ला मसलत व आर्थिक साक्षरतेसाठी जबाबदारी राहणार आहे.

No comments

Powered by Blogger.