माढ्याचा किल्ला फलटणकरांचाच
सातारा: सध्या लोकसभेचे नगारे वाजू लागले आहेत. माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव मावळ लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवारांच्या यादीत घेतले जात आहे. सातार्‍यात मनोमिलनाचे वारे वाहू लागल्याने फलटणकरांना माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी, म्हणून आग्रह धरला जात आहे. गतवेळेस ना. श्रीमंत रामराजे यांचे नाव सातारा व माढा लोकसभा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे सुप्रिमो खासदार शरद पवार यांनी गतवेळेस लक्ष दिले नाही. यावेळेस पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीसोबत असलेल्या फलटणकरांकडे माढ्याचा किल्ला शरद पवार सोपवणार का? वास्तविक इतिहास पाहिल्यास माढा लोकसभा मतदार संघाचा बहुतांश भाग हा फलटण संस्थानच्या अधिपत्याखाली होता. वर्तमानात इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? माढा फलटणकरांकडे येणार का? असेच विचारावे लागेल.

खुद्द माढा गावात फलटणकरांचा भुईकोट किल्ला

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या माढा गावात अजूनही फलटणकरांच्या भुईकोट किल्ल्याचे अवशेष दिसतात. माढा गावात अजूनही नाईक निंबाळकरांचा भला मोठा भुईकोट किल्ला आहे. काळाच्या ओघात या किल्ल्याची दुरावस्था झाली असली तरी माढ्याचा किल्ला हा नाईक निंबाळकरांचाच किल्ला म्हणून ओळखला जातो.

माढ्यातील निंबाळकरांचे ऋणानुबंध मालोजीराजेंनीही जपले
माढा (जि. सोलापूर) येथे आजही नाईक निंबाळकरांचा किल्ला आहे. या किल्ल्याला चार बुरुंज आहेत. येथील सरदार श्रीमंत रावरंभा नाईक निंबाळकर हे फलटणच्या श्रीमंत महादजी नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव होते. माढ्याच्या गादीवरील शेवटचे श्रीमंत रावरंभा यांना दोन मुली होत्या. एक श्रीमंत ताराराजे तर दुसर्‍या श्रीमंत गजराराजे. यापैकी श्रीमंत ताराराजे या आमदार होत्या. महाराष्ट्र राज्याचे पहिले बांधकाम मंत्री स्व. श्रीमंत मालोजीराजे यांनीच त्यांना आमदार केले होते. नंतर श्रीमंत ताराराजेंचा विवाह वाळव्याच्या थोरात सरकारांशी झाला. तर दुसर्‍या कन्या श्रीमंत गजराराजे यांचा विवाह घोसडवाडकर शिंदेंना दिल्या होत्या. फलटण संस्थानचे व माढा येथील निंबाळकरांचे अजूनही निकटचे संबंध आहेत.

वंशवेलीचा विस्तार लोकसभेसाठी निश्‍चितच होणार

माढा, करमाळा, अकलुजचा किल्ला, कर्जत, जामखेड ही ठाणी फलटणकर नाईक निंबाळकर व माढ्यातील रावरंभा नाईक निंबाळकर यांचीच होती. सोलापूरातील वैराग बार्शी हे देखील श्रीमंत सबाजीराव नाईक निंबाळकरांकडेच होते. याखेरीज फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या अधिपत्याखाली बीड जिल्ह्यातील ब्रह्मगाव म्हाळूंगे, आष्टी तालुका हा भागही नाईक निंबाळकरांच्या जहागिरीचाच भाग होता. या सर्व भागात नाईक निंबाळकर व त्यांचे वशंवेलीतील विस्तार दिसून येतो. माढा लोकसभा मतदार संघात निवडणुक लढवताना नाईक निंबाळकरांच्या या वंशवेलीच्या विस्ताराचा मोठा फायदा होणार आहे.

शरद पवारांचा कौल महत्वाचा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचे सुप्रिमो खासदार शरद पवार यांच्यासमवेत राहिलेल्या नाईक निंबाळकरांना पवार लोकसभेसाठी संधी देणार का? माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव मावळ लोकसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवारांच्या यादीत येत आहे. त्यांच्या उमेदवारीचा विचार होत असेल तर पक्ष वाढीसाठी काबाड कष्ट घेणार्‍या नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीचा विचारही पवारांनी करावा. ना. श्रीमंत रामराजे किंवा श्रीमंत संजीवराजे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे. आता फक्त शरद पवारांचा कौल महत्वाचा आहे. बाकी तयारी करण्यासाठी माढ्यातील नाईक निंबाळकर आहेत.

No comments

Powered by Blogger.