Your Own Digital Platform

मोदी सरकारला सत्तेतून हाकला:शरद पवार

फलटण: आश्वासनांचा पाऊस, जातीय/धार्मिक तेढ निर्माण करणे, स्वायत्त सहकारी संस्थांची मोडतोड, न्यायपालिका, सीबीआय, रिझर्व बँकेवर अघोषीत नियंत्रण, शेती, उद्योग व्यवसायाच्या बाबतीत चुकीची धोरणे याद्वारे संपूर्ण देशाला वेठीस धरून कार्यरत राहिलेल्या मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर घालविल्याशिवाय सर्वसामान्य जनता सुखी होणार नाही याची खात्री झाल्याने विविध राज्यातील 22 राजकीय पक्ष एकत्र आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदार संघातील फलटण - कोरेगाव आणि माण - खटाव या दोन विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य यांच्या फलटण येथे आयोजित संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना खा. शरद पवार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, आ. दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सुभाषराव शिंदे, डॉ. विजयराव बोरावके, अजितराव राजेमाने, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, निवृत्त महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मुंबई बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर, फलटण पंचायत समिती उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, शेखरभाऊ गोरे, सुरेंद्र गुदगे, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे नगर परिषद विविध विषय समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. राजश्री शिंदे, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वसामान्यांचा भ्रमनिरास

मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षातील कारभाराबाबत केवळ राजकीय पक्षांची नाराजी आहे असे नव्हे तर सर्वसामान्य जनतेने गत निवडणूका पूर्वी आश्वासनांचे व अच्छे दिनच्या घोषनेमुळे भर भरून मते दिली मात्र प्रत्यक्ष त्यांचाही भ्रमनिरास झाल्याने निवडणूका झालेल्या तीन राज्यातील मतदारांनी या सरकारला नाकारल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. या तीन राज्यातील भाजपाची सत्ता नेस्तनाबूत करून तेथील जनतेने सत्ता बदल स्वीकारला उर्वरित राज्यात यापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याचे स्पष्ट करतानाच ना खाऊंगा, ना खाणे दुंगा, फिर किसने खाया असा उपरोधिक सवाल करीत खा. शरद पवार यांनी या देशातील सत्तेतून मोदींना आणि त्यांच्या भाजपला प्रथम घालवा नंतर कोण पंतप्रधान, कोण मंत्री याची चर्चा करू असे प्रतिपादन केले.

निष्क्रीय मोदी सरकारविरुध्द मोठी लाट

नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण वगैरे प्रकरणांबाबत सविस्तर माहिती देऊन रिझर्व बँकेच्या गव्हर्नरला काम करू दिले नाही. न्यायपालिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकारांसमोर घेतलेली भूमिका, सीबीआय प्रमुखाला रात्री दोन वाजता बदलण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलेली फेरनियुक्ती या सर्व बाबी केंद्रातील मोदी सरकारची निष्क्रियता दर्शवणार्या असल्याचे स्पष्ट करीत यापुढे ही निष्क्रियता, वाचाळता, चुकीची धोरणे याद्वारे होणारे देशाचे नुकसान टाळण्यासाठी सामान्य माणूस भाजपाविरुध्द मतदानासाठी उत्सुक असल्याचे खा. पवार यांनी स्पष्ट केले.

500 कोटीचे राफेल 1630 कोटीला

राफेल प्रकरणातील आर्थिक घोटाळ्यां विषयी स्पष्टीकरण देत मनमोहन सिंग सरकारने सदरची विमाने 500 कोटी रुपयाला एक याप्रमाणे खरेदीचा निर्णय केला होता मात्र तीच विमाने मोदी सरकारने प्रत्येकी 1630 कोटी रुपयास याप्रमाणे खरेदीचा निर्णय केला. त्यापुढे जाऊन या विमानांची दुरुस्ती-देखभाल किंवा त्यात संरक्षण यंत्रणा बसविण्यासाठी शासनाचे संरक्षण खात्यांतर्गत तीन विमान कारखाने उपलब्ध असताना त्यांना टाळून अनिल अंबानी यांच्या अस्तित्वात नसलेल्या कारखान्यावर ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला वास्तविक अंबानींच्या या प्रस्तावित कारखान्यासाठी नागपूर येथे केवळ भूखंड उपलब्ध आहे त्यावर इमारत उभारणेे, त्यामध्ये मशिनरी बसविणे अद्याप कागदावरच आहे या उलट संरक्षण दलातील मिग विमान कारखाने यासाठी सज्ज असताना उद्योगपती अनिल अंबानी यांचेवर मेहेरनजर का? असा सवाल खा. पवार यांनी उपस्थित केला.

मोदी संसदीय समितीला का घाबरले

राफेल प्रकरणी संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी करण्यात आली मात्र मोदींनी त्याची पूर्तता केली नाही. वास्तविक अशा प्रकरणात संसदीय समितीच्या माध्यमातून सर्व बाबी तपासून घेऊन आपली स्वच्छ प्रतिमा संसद आणि सर्वसामान्यांसमोर ठेवण्यास मोदी का कचरले असा सवाल करीत यापूर्वी संसदेत स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान असताना बोफोर्स प्रकरणात यांच सत्ताधार्यांनी विरोधात असताना संसदीय समितीची मागणी केली ती तात्काळ मान्य करीत स्वर्गीय राजीव गांधी चौकशीस सामोरे गेले त्यातून दूध का दूध आणि पानी का पानी सामने आया स्वर्गीय राजीव गांधी चौकशीस घाबरले नाहीत मग नरेंद्र मोदी का घाबरतात असा सवाल खा. पवार यांनी उपस्थित केला

लोकांच्या इच्छा, अपेक्षांसाठी रिंगणात

एकूणच देशाची संरक्षण व्यवस्था, सीबीआय, रिझर्व बँक यांचेवरील अघोषित नियंत्रण, नोटाबंदी, जीएसटी, शेतीबाबत चुकीची धोरणे यामुळे देशातील सर्वसामान्य जनता व्यापारी उद्योजक वगैरे सर्वच घटकांतील नाराजी लक्षात घेऊन देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ततेसाठी सत्ताबदलाची भूमिका घेतल्याचे स्पष्ट करीत खा. पवार यांनी मोदी सरकार वर चौफेर टीका केली.

एकसंधतेच्या बैठकीला भाजपा अनुपस्थित

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी एकसंघ ताकद उभी करण्याची आवश्यकता व्यक्त केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी देशाच्या लोकशाही आणि सैन्याचे मनोधैर्य अबाधीत राखण्यासाठी राजकारण बाजूला ठेवले. एकसंधतेची भूमिका स्वीकारली मात्र देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणार्या नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पक्षाचे राजकारण आणि सत्ता महत्वाची वाटली ते यवतमाळ आणि जळगाव येथील कार्यक्रमात व्यस्त राहिले त्याचबरोबर शासनाने बोलाविलेल्या या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री म्हणून राजनाथ सिंह, मंत्री अशोक गेहलोत उपस्थित राहिले ते मंत्री म्हणून मात्र भाजपच्या एकाही पदाधिकार्यांनी सदर बैठकीस उपस्थिती लावली नसल्याचे निदर्शनास आणून देत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला भारतीय सैन्य दल आणि लोकशाही विषयी असलेला आदर आणि जबाबदारीची जाणीव नसल्याचे यातून स्पष्ट झाल्याचे नमूद करीत 2014 पासून गेल्या पाच वर्षात सैन्य दलावर झालेले अतिरेकी हल्ले त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले जवान, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी सामान्य नागरिकांची संख्या लक्षणीय असून आणि या सगळ्याला शेजारच्या राष्ट्राची फुस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधानांची भूमिका आणि भारतीय जनता पार्टीची सर्वपक्षीय बैठकीत अनुपस्थिती काय दर्शविते असा सवाल खा. पवार यांनी उपस्थित केला