सत्कर्म केल्याने भाऊसाहेब महाराजांचे नाव अमर: ह.भ.प. इंगळे महाराज

गांधी मैदान येथे किर्तन सादर करताना ह.भ.प. बाबा महाराज इंगळे. 
सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मीती करुन जनकल्याण साधले. मानवालाच नव्हे तर, देवालाही कर्म चुकलेले नाही. मात्र चांगले कर्म करुन छ. शिवाजी महाराज अमर झाले. त्याच पध्दतीने छत्रपती शिवरायांराचा समाजकार्याचा, जनकल्याणाचा वारसा छत्रपतींच्या घराण्यात जन्मलेल्या अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी अविरत जोपासला. थोर महात्म्यांचेच पुण्यस्मरण केले जातेत. आजच्या किर्तनाला लोटलेला जनसागर पाहूनच भाऊसाहेब महाराज काय होते, हे दिसून येते. त्यांच्या महान किर्तीमुळे आजही ते आपल्यात आहेत. सत्कर्म, जनेसेवा केल्यानेच भाऊसाहेब महाराजांचे नाव अमर झाले आहे.,त्यांच्या पश्‍चात त्यांचे सुपुत्र आणि असंख्य कार्यकर्ते हा वारसा पुढे चालवत असून असे उदाहरण क्वचीतच पहावयास मिळते, असे प्रतिपादन थोर समाजप्रबोधनकार आणि समाजसुधारक विनोदाचार्य ह.भ.प. बाबा महाराज इंगळे (बीड) यांनी केले.

गांधी मैदान येथे कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने स्व. आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त आयोजित किर्तन, प्रवचन सोहळ्यात ह.भ.प. बाबा महाराज इंगळे बोलत होते. यावेळी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, श्रीमंत ओजस्विताराजे गायकवाड, श्रीमंत सत्वशिलाराजे सिंग, श्रीमंत छ. रुनालीराजे भोसले, ह.भ.प. महाराष्ट्रभूषण मदनमहराज कदम, ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांच्यासह गुरुकूल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आंबेघर (मेढा), ह.भ.प. बबनराव सापते, ह.भ.प. श्रीपती माने, ह.भ.प. उमेश किर्दत महाराज आदी मान्यवरांसह हजारो सातारकर नागरिक आणि महिला उपस्थित होते.

किर्तनाच्या सुरुवातीला रसाळ अंभंगवाणीने आणि टाळ- मृदुंगाच्या गजराने सातारकर भक्तीरसात ओलेचिंब झाले. अभंगवाणीत तल्लनी झालेल्या सातारकरांना ह.भ.प. बाबा महाराज इंगळे यांनी संत निळोबाराय यांच्या नाम वाचे श्रवण किर्ती. पाडले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी, धरीला मनी विठ्ठल. या अभंगावर किर्तन सादर करुन वास्तवाचे भान करुन दिले. आपल्या खास विनोदी शैलीत अनेक विनोदी किस्से सांगून इंगळे महाराजांनी उपस्थितांना खळखळुन हसायला लावले. जन्माला येण्याची इच्छा नसतानाही मानवाला जन्म घ्यावा लागतो आणि मरणाची इच्छा नसतानाही मानवाला मृत्यू येतो. याचा अर्थ जन्म आणि मृत्यू मानवाच्या हाती नाही. हा सृष्टीचा नियम आहे. देव जन्माला घालताना काही देत नाही आणि परत नेतानाही काही नेवू देत नाही. जोपर्यंत आहोत तोपर्यंत चांगले कर्म केले पाहिजे तरच हे जीवन सार्थकी लागणार आहे. जीवन कसे जगावे. निर्व्यसनी, सज्जनपणे आणि सदाचाराने जीवन जगावे असे सांगून इंगे महाराजांनी भरकटत चाललेल्या युवा पिढीच्या वर्मावर बोट ठेवले. संसार कितीही नेटका करा, शेवटी आपल्या हातात काहीही शिल्लक नसते. जन्म आणि मृत्यूमध्ये काहीही विशेष नाही, विशेष आहे ते कर्मात आहे. ज्या भाऊसाहेब महाराजांनी अनन्यसाधारण कर्म करुन जनसेवा केली. अखंडपणे जनसेवेसाठी झटणार्‍या या महान राजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपला. समाजकार्य हे परंपरेने होत नसते तर ते कृतीने होत असते. हेच स्व. अभयसिंहराजे यांनी दाखवून दिले आहे.

या भूतलावर कोणीही अमर नाही. जो चांगले कार्य करतो त्याचेच नाव शेवटपर्यंत राहते. स्व. भाऊसाहेब महाराजांनी समाजकार्य करुन एक आदर्श निमाळ केला. त्यामुळेच आज त्यांचे नाव सर्वांच्या मुखी कायम आहे. त्यामुळे सतकर्म करा, दुसर्‍यासाठी जगा आणि आपले नाव अमर करा, असा संदेश इंगळे महाराज यांनी किर्तनातून दिला. त्यांना गुरुकूल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आंबेघर, संदीप जाधव, निळोबा (मृदंग), बाळासाहेब चव्हाण, सर (हार्मोनियम), प्रवीण महाराज शेलार (टाळ व विणा) यांनी साथ दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या टिमने परिश्रम घेतले.

सकाळपासूनच स्व. भाऊसाहेब महाराजांना विविध स्वराज्य संस्थांमध्ये अभिवादन करण्यात आले. शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आणि लायन्स क्लब सातारा अजिंक्य यांच्या संयुक्त विद्यमाने कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे चुंबकीय उपचार व निसर्गोपचार मार्गदर्शन शिबीरास प्रारंभ झाला.

कळंबे येथील सुविध्या माध्यमिक विद्यालयात राजेंद्र लवंगारे यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. बळीराजा सामाजिक संस्था करंजे तर्फ रामकुंड यांच्यावतीने शिवशंभो महादेव मंदीर, दौलतनगर येथेही अभिवादन आले. चिंचणी येथे ग्रामस्थांच्यावतीने भजन, किर्तन व अभिवादनाचा कार्यकम झाला. तसेच सातारा नगरपरिषद, सातारा पंचायत समिती, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयातही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम झाला. रिमांडहोम येथे प्रकाश बडेकर यांच्यावतीने मुलांना अन्नदान करण्यात आले.

No comments

Powered by Blogger.