Your Own Digital Platform

पुलवामा हल्ल्यात सातारचा जवान जखमी


सातारा : १४ फेब्रुवारी रोजी दुपारी जम्म्मू काश्मीर रस्त्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 42 जवान शहीद झाल्याने संपूर्ण भारत देश हळहळला आहे. हा हल्ला झाला त्यावेळी रुई येथील सुशांत वीर हे जवान तेथेच अवघ्या 200 मीटर अंतरावर होते. या बॉम्‍बची तीव्रता इतकी होती की, या स्‍फोटात सुशांत हे जखमी झाले आहेत. दोन दिवसानंतर शनिवारी सुशांत यांनी रुई येथील कुटुंबियांशी संपर्क साधून आपण सुखरूप असल्याचे सांगितले आणि कुटुंबियांनी सुटकेचा निश्चास टाकला. सुशांत यांचा फोन येताचं कुटुंबातील सदस्‍यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

सुशांत विर हे आपली ९ फेब्रुवारीपर्यंतची सुट्‍टी संपवून आपल्‍या सेवेसाठी पुन्हा रूजू होण्यासाठी गेले होते. यावेळी ते 11 फेब्रुवारी रोजी जम्मू मध्ये पोहचले. रस्ते बंद असल्याने ते तेथेच लष्करी छावणीत थांबले होते. 14 फेब्रुवारी रोजी लष्करी वाहनातून जात असताना दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार लष्‍करी ताफ्‍यातील बसला आदळवुन स्‍फोट केला. ज्या बसला कार धडकवली तेथून 1500 मीटर अंतरावरील पाठीमागच्या बसमध्ये सुशांत वीर होते. हा स्‍फोट इतका मोठा होता की, धडकवलेल्‍या बसचा चेंदामेंदा झाला, तर सुशांत ज्‍या पाठीमागच्या गाडीत बसले होते त्‍या गाडीच्या काचा, लोखंडी पत्रा हा ज्वालाग्राही झाल्याने त्‍यात ते जखमी झाले. त्‍यांच्यावर जम्‍मू काश्मीरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर देशभरातील माध्यमांनी ही घटना टीव्हीवर दाखवल्‍याने सुशांत यांच्या घरामध्ये चिंतेचे वातावरण परसले होते. मात्र सुशांत यांनी आपण सुखरूप असल्‍याचे कुटुंबियांना कळविल्‍याने घरातल्‍या सदस्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला.