Your Own Digital Platform

महासत्तांतील साठमारी हे जागतिक दहशतवादाचे मूळ
एका बाजूने आपल्याच देशातले हे तरुण दहशतवादी होतात आणि दुसर्‍या बाजूला त्यांचा नायनाट करण्याच्या प्रयत्नात होणार्‍या हिंसाचारात पुन्हा आपल्याच देशातले तरुण प्राण गमावतात. नुकसान आपलेच. यात कोणाचे काय चुकले वा चुकते याच्या हिशेबाची ही वेळ नव्हे. तथापि या दुहेरी दुर्दैवाची जाणीव करून देण्यासाठी मात्र हीच वेळ आहे. ती साधून पाकिस्तानबरोबरच या शोकांतिकेच्या खर्‍या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न हवा. महासत्तांतील साठमारी हे जागतिक दहशतवादाचे मूळ आहे. जैश ए महंमद, पाकिस्तान वगरे केवळ फांद्या.

अमेरिकेने अफगाणिस्तानात तालिबान्यांशी बोलणी सुरू करण्याचा निर्णय घेणे आणि त्याच तालिबानच्या आधारे फोफावलेल्या जैश ए महंमद संघटनेने काश्मिरात उत्पात घडवून आणणे यांत थेट संबंध आहे. काश्मिरातील ताज्या दहशतवादी हल्ल्याच्या इशार्‍याची ध्वनिचित्रफीत अफगाणिस्तानात प्रसृत होणे यातून तोच दिसून येतो. तालिबानच्या मुद्दयावर अमेरिकेच्या धोरणात बदल होऊन 24 तासही उलटायच्या आत हा दहशतवादी हल्ला झाला ही बाबदेखील हे समीकरण समजून घेण्यासाठी महत्त्वाची.

जैश ए महंमद या विषवेलीस तालिबानचा आधार असून या संघटनेचा प्रमुख मसूद अझर याला पाकिस्तानचे पूर्ण संरक्षण आहे. आणि या मुद्दयावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचा उघड पाठिंबा आहे. त्यामुळे या मसूद अझर यास दहशतवादी म्हणून जाहीर करावे यासाठीचे आपले सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात. संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात या संदर्भातील आपल्या ठरावात सातत्याने चीनकडून खोडा घातला गेला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात वुहान येथे उभय देशप्रमुखांत झालेल्या चच्रेनंतर दहशतवादासंदर्भात चीनच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे सांगितले गेले. ते खरे असेलही. पण मसूद अझरसंदर्भात चीनच्या धोरणात तसूभरही बदल झालेला नाही. काश्मिरातील ताज्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणार्‍यांत आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन सर्वात शेवटी होता, ही बाबदेखील याच सत्याची जाणीव करून देते.

हे चिनी अभय आणि तालिबानच्या मुद्दयावर अमेरिकेचे बदललेले धोरण यामुळे जैश ए महंमद पुन्हा सक्रिय झाली असून त्याचमुळे असा भयानक, निंदनीय आणि घृणास्पद हल्ला ती करू शकली. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच. गेल्या जवळपास दोन दशकांत जैशच्या कारवाया चढत्या क्रमाने हिंसक होत आल्या आहेत. 2001 साली संसदेवरील हल्ल्यापासून ही संघटना चच्रेत आली. पठाणकोट आणि उरी येथील लष्करी तळांवर दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यांमागेही याच संघटनेचा हात होता. या संघटनेने पाकिस्तानातही असेच उद्योग केले आहेत. त्या देशाचे माजी अध्यक्ष लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावरही हल्ल्याचा या संघटनेने दोन वेळा प्रयत्न केला. या संघटनेचा प्रमुख मसूद अझर म्हणजे 1999 साली कंदाहार विमान अपहरण प्रकरणात प्रवाशांच्या सुटकेसाठी आपणास ज्यास सोडून द्यावे लागले होते तो. त्यानंतर त्याचे आपल्याविरोधातील उद्योग वाढतच गेले. पाकिस्तानात नुकतेच सत्तेवर आलेल्या इम्रान खान सरकारमुळे त्यास पुन्हा एकदा मोकाट सुटण्याची संधी मिळाली असून त्यामुळे पाकिस्तानविरोधात आपण दबाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले ते योग्यच. पण त्याच वेळी ते अमेरिका आणि चीन यांच्याही आघाडीवर असायला हवेत. अमेरिका अफगाणिस्तानात तालिबान्यांशी चर्चा करणार आणि आपण काश्मिरात मौन पाळणार हे अयोग्य. हे या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीय परिमाण. पण स्थानिक पातळीवरील वास्तव काय?

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या सार्‍यात हेरगिरीतील अपयश मान्य केले. तथापि या अपयशामागील कारण आहे स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या केंद्रीय नियुक्त्या. त्यामुळे पोलीस आदी यंत्रणांतून स्थानिक पोलीस अधिकारी मागे फेकले गेले. या स्थानिक पोलीस अधिकार्‍यांचे गावपातळीवर खबर्‍यांचे जाळे होते. ते विस्कटले गेले. त्यामुळे खालून वर जाणार्‍या माहितीत खंड पडला. तसेच स्थानिक पातळीवरील सरकारी संवादाची व्यवस्थाही विस्कळीत झाली. त्यामुळे तेथे प्रशासनाची नागरिकांशी असलेली नाळ तुटली. ती पुन्हा जोडली जावी यासाठी सध्या प्रयत्नदेखील सुरू नाहीत.

या मानवी वा भौतिक साधनसामग्रीपलीकडे या प्रश्नाच्या मुळाशी आणखी एक मुद्दा आहे. या राज्यातील कोवळ्या, अशिक्षित वा अल्पशिक्षित तसेच अलीकडे सुशिक्षितही, तरुणांना आपले आयुष्य हे असे मरणाच्या दारात फेकावे असे का वाटते, हा तो मुद्दा. या तरुणांच्या मनातील खदखद,

प्रगतीची संधीच नसल्याने येणारे रिकामपण यावर आपल्याकडे काय तोडगा आहे? तो शोधण्यासाठी आपण काही प्रयत्न करीत आहोत का? रिकामे मन आणि बिनकामाचे हात हे दैत्यासाठीचे सुपीक प्रदेश असतात. अशी सुपीक बेटेच्या बेटे काश्मिरात भकास नजरेने हिंडताना आढळतात. जन्नतच्या आशेने ते सहज पाकिस्तानच्या हाती लागतात आणि बघता बघता या सर्वसामान्य तरुणांचे दहशतवाद्यांत रूपांतर होते. तसे ते झाल्यावर लष्करी आयुधांनी त्यांना दूर करणे हा एकमेव पर्याय राहतो. त्यास इलाज नाही. पण हे दहशतवादीकरण होऊच नये यासाठी आपण काय करतो हा खरा प्रश्न आहे. आणि तेथेच या प्रश्नाचे प्रामाणिक आणि कायमस्वरूपी उत्तर दडलेले आहे.