मोघे व गंगावणे यांनी उलगडले स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेचे अंतरंग
पाटण,: साहित्य, नाट्य, चित्रपट, गीतकार अशा समृद्ध परंपरेेचा वारसा लाभलेेले वडील श्रीकांत मोघे आणि काका सुधीर मोघे अशा सुसंस्कृत कुटुंबाच्या घराण्यात जन्म झाला. नाट्य, चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा वडिलांपासून मिळाली. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर करिअरबाबत विचार करत असता लोकांचा आणि पैशाचा विचार करू नकोस, आवडत नाही ते दबावाखाली करायचे नाही. देवाने खूप सुंदर आयुष्य दिले आहे. जे आवडते तेच निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे हेच क्षेत्र करिअरसाठी निवडले. भूमिकेत शिरल्यावर भूमिकेशी प्रामाणिक राहून काम करण्यामुळे जीवनालाही अर्थ लाभतो. साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ शिवरायांवर असणार्या जनमानसाच्या अपार श्रद्धेमुळे भूमिकेला यश मिळाले. या पडद्यावर जरी आम्ही भूमिका पार पाडत असलो तरी या मालिकेच्या यशस्वितेमागे प्रताप गंंगावणे यांची सिद्धहस्त लेखणी पडद्यामागील यशाची शिल्पकार आहे. शिवराय व संभाजी महाराजांच्या जीवनातील खर्याखुर्या ऐतिहासिक घटना, प्रसंग आणि साक्षात काळ उभा करणारे पटकथाकार प्रताप गंगावणे व शिवाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते शंतनू मोघे यांनी आपल्या अमोघ वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
येथील स्वा. सै. भडकबाबा पाटणकर नगरीत सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनात स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेचे पटकथाकार प्रताप गंगावणे व मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते शंतून मोघे यांची कवी प्रदीप कांबळे यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी या मालिकेची पार्श्वभूमी आणि मालिकेला मिळालेल्या यशाची वाटचाल उलगडून दाखविली.
अभिनेते शंतनू मोघे म्हणाले, वतनदारीचा वध करून रयतेचा विश्वास संपादन करण्याचा विचार बिंबवणार्या शिवाजी महाराजांना माणूस म्हणून लोकांसमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य प्रताप गंगावणे यांच्या सिद्धहस्त लेखणीने केले आहे. रयतेचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची मिळालेली संधी हा जीवनातील भाग्याचा क्षण आहे. हे भाग्य डॉ. अमोल कोल्हे, प्रताप गंगावणे आणि झी टीव्हीमुळे मला लाभले. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेत गोदावरीची भूमिका साकारणारी प्रिया सारखी सहचारिणी असून तिची भक्कम साथ लाभली आहे.
प्रताप गंगावणे म्हणाले, लिखाणामुळे डोंगराएवढी माणसं भेटली, माणूस वाचण्याची कला लाभली, आयुष्याला वैचारिक बैठक मिळाली. आपली स्फूर्ती, चेतना आणि श्वास असणार्या शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्याविषयी इतिहासात सर्वात जास्त गैरसमज निर्माण करण्यात आले आणि विकृत इतिहासाच्या धारणेचे हे ओझे समाजमनाने शतकानुशतके वाहिले. बाजीराव- मस्तानीचाही विकृत इतिहास मांडला गेला. समृद्ध ग्रंथालय आणि पाच ग्रंथांचे लेखन करणारे संभाजी महाराज बदफैली, ऐय्याशी, व्यसनी कसे असू शकतात? संभाजी महाराजांच्या धगधगत्या जीवनात रचलेले गोदावरी प्रकरण विकृत असून इतिहासकारांनी रचलेला विकृत इतिहास पुसून संभाजी महाराजांचा खराखुरा इतिहास समोर आणणे हा अवघड विषय होता. इतिहासाचा डोळस अभ्यास करून खरा इतिहास समोर आणण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य लाभल्याने इतिहासकारांनी रचलेला विकृत इतिहास खर्या इतिहासाला आव्हान देऊ शकत नाही. इतिहासातील गोम ओळखल्यामुळेच खरा इतिहास पुढे आला. आई, वडील, मोठा भाऊ, गुरुजनांचे संस्कार यामुळेच लेखन प्रवासाची वाटचाल सुरू झाली. तीन पानांच्या धड्यासाठी अख्खे नाटक वाचून दाखवणारे एस. आर. पाटील सर आणि लहान वयात वाचनासाठी चांदोबा अंक आणून देणारा मोठा भाऊ यांच्यामुळे लेखन प्रवासाच्या वाटचालीला पंख लाभले. आजपर्यंत विविध भाषेतील 80 चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून 20 पटकथा तयार आहेत. दहा व्यावसायिक नाटके तसेच बारा बालनाट्यांचे लेखन केले आहे.
यावेळी प्रताप गंगावणे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी स्वागत केले. दादासाहेब कदम यांनी सूत्रसंचालन केले. अभिनेते समृद्धी जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास भाजपचे प्रवक्ते भरत पाटील, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, आरपीआयचे तालुकाध्यक्ष रवींद्र सोनावले, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, सपोनि. उत्तमराव भापकर, अभिनेते संजय पाटील, आयेशा सय्यद, उदयसिंह पाटणकर, दिलीपराव मोटे, आबासाहेब भोळे, एकनाथराव थोरात, ए. व्ही. देशपांडे, अशाकेराव देवकांत, ज्ञानदेव गावडे, सय्यद हकीम, पी. डी. खांडके, शंकर कुंभार, यादवराव देवकांत, जयवंतराव पाटील, फत्तेसिंह पाटणकर, जगदीश पाटणकर, डॉ. रघुनाथ नांगरे यांच्यासह ग्रंथ, साहित्यप्रेमी, श्रोते, युवक, युवती, महिला उपस्थित होत्या.
Post a Comment