Your Own Digital Platform

बरड गोळीबारप्रकरणी सूत्रधारासह चौघे जेरबंद

सातारा : बरड येथील पुणे-पंढरपूर मार्गावर गुलाब ऊर्फ गोट्या भंडलकर याच्यावर दि. 28 डिसेंबर रोजी तिघांनी गोळीबार केला होता. कल्याण दादासो गावडे (वय 32, रा. गुणवरे, ता. फलटण) व भंडलकर याचा जमिनीचा वाद सुरू होता. या वादातूनच गायकवाड याने कर्जत येथील तिघांना 10 लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्यामार्फत भंडलकर याच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्याप्रकरणी गायकवाड याच्यासह तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या प्रकरणातील सूत्रधार कल्याण दादासो गावडे याच्यासह अमर धनराज बेदरे (वय 22), वैभव सूर्यभान बेदरे (वय 23, दोघेही रा. सुपे, ता. कर्जत, जि. नगर) आणि ज्ञानेश्‍वर नारायण साबळे (वय 31, रा. शिंदा, ता. कर्जत जि. नगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पंकज देशमुख म्हणाले, 28 डिसेंबर रोजी गोट्या उर्फ गुलाब भंडलकर (वय 42, रा. गुणवरे, ता. फलटण) हा पुणे-पंढरपूर रस्त्यावरून गुणवरेवरून बरडला जात होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी भंडलकर याच्यावर गोळीबार केला होता. या खुनी हल्ल्यात भंडलकर हा गंभीर जखमी झाला होता. हे प्रकरण गंभीर असल्याने तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर स्वत: घटनास्थळी भेट दिली होती. या दरम्यान खबर्याकडून गुणवरे येथील कल्याण गावडे याच्यासोबत गुलाब भंडलकर याचा वाद झाला होता. याच कारणातून हा खूनी हल्ला झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यामध्ये गोळीबार करणारे हे कर्जत, जि. नगर येथील असल्याचे समजले होते. त्यानुसार एलसीबीचे पोनि विजय कुंभार, सपोनि विकास जाधव व सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली. या पथकांमार्फत गुणवरे येथून कल्याण गायकवाड याला गुणवरेतून अटक केली.

त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता पुनर्वसन कायद्यप्रमाणे वडील व चुलत्यांच्या नावे असलेली गट नं 208 मधील 15 एकर व 10 आर इतकी जमित 2000 मध्ये विठ्ठल रांजणे, बबन सपकाळ, साहेबराव रांजणे यांच्या नावाने झालेली होती. परंतु, तेथे पाणी नसल्याने ही जमिनी खंडाने करत होतो. याचे लेखी करार नव्हते तसेच यामधील 70 गुंठे जमिनी साठे खत करून विकत घेतली होती. परंतु, त्याच गटातील 9 एकर 30 गुंठे जमिन गुलाब भंडलकर व त्याच्या जोडीदारांनी साठेखत करून घेतली. तेव्हापासून खंडाने करत असलेली जमिन गुलाब व त्याच्या जोडीदारांनी ताब्यात घेतली होती. तसेच त्याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यातूनच गावडे याने अमर बेदरे, वैभव बेदरे व ज्ञानेश्‍वर साबळे यांना भंडलकर याला जीवे मारण्यासाठी 10 लाख रूपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. या तिघांना गावडे यानेच हत्यार दिले आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. या कारवाईत सहाय्यक पोलिस फौजदार मोहन घोरपडे, हवालदार उत्तम दबडे, विजय शिर्के, तानाजी माने, संतौष पवार, पोना नितीन गोगावले, मुबीन मुलाणी निलेश काटकर, प्रवीण फडतरे, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन यांनी सहभाग घेतला होता.

‘मोका’चा सपाटा लागणार

दोन महिन्यांच्या कालावधीवर लोकसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दल सतर्क झाले असून तयारीला वेग आला आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक कालावधीत ज्यांच्याकडून त्रास होऊ शकतो त्यांची यादी तयार झाली असून ‘मोका’चा सपाटा लावला जाणार आहे. जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी काहीच दिवसांपूर्वी सम्राट खून प्रकरणी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी रावण टोळीतील 10 जणांना मोक्का लावला आहे. या कारवाईतूनच त्यांनी मोक्क्याचे खाते उघडले असून यापुढे अनेक जण त्यांच्या रडारवर आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा मनोदय व्यक्त करून दाखवला. ज्यांच्यावर खूनाचा प्रयत्न, दरोडा अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा पंटरांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी मोक्क्याच्या कारवाई होण्याचे संकेत आहेत.