Your Own Digital Platform

उदयनराजेंना शिवेंद्रराजेंच्या गटाचा विरोध
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असतानाच शुक्रवारी आ. शिवेंद्रराजे भोसले गटाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी बारामतीत जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटून उदयनराजेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. ‘त्यांच्या वेळी रडारडी करतात, आमची वेळ आली की पाडापाडी करतात,’ अशा शब्दांत शिवेंद्रराजेंच्या पदाधिकार्यांनी पवारांजवळ गार्हाणे मांडले. शिवेंद्रराजेंनी सांगितले, तरी आता उदयनराजेंचे काम आम्ही करणार नाही, असेही या समर्थकांनी पवारांना सांगितल्याने सातार्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पवारांनीही शिवेंद्रराजेंसह सर्वच आमदारांना विचारल्याशिवाय आपण निर्णय घेणार नाही, अशी ग्वाही दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उदयनराजे भोसले यांचे नाव जवळजवळ निश्चित आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उदयनराजेंसाठी कमालीचे अनुकुल आहेत. त्यासाठी गेले काही महिने पक्षांतर्गत मोहिमा थोपवण्यासाठीच पवार स्वत:च लक्ष घालत आहेत. शिवेंद्रराजेंचीही त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शिवेंद्रराजेंच्या दिल्ली भेटीनंतर कथित मनोमीलनाची टूम निघाली. उदयनराजेंची उमेदवारीही त्यामुळे निर्धोक वाटू लागली. गुरुवारी तर मुंबईतून त्यांची उमेदवारी जाहीर होणार होती. मात्र, सातार्यात वेगळेच काही घडत होते. शिवेंद्रराजेंच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी सायंकाळी शरद पवारांना भेटीची वेळ मागितली. पवारांनी त्यांना बारामतीत भेटीची वेळ दिली. त्यानुसार शुक्रवारी पाच गाड्या थेट बारामतीत पवारांकडे गेल्या. स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्यापासूनचे कार्यकर्ते त्यामध्ये होते. मार्केट कमिटीचे माजी चेअरमन लालासाहेब पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी शिक्षण सभापती सतीश चव्हाण, माजी कृषि सभापती किरण साबळे-पाटील, माजी जि. प. सदस्य राजू भोसले, अजिंक्यतारा कारखान्याचे माजी चेअरमन रामभाऊ जगदाळे, विद्यमान चेअरमन सर्जेराव सावंत, धनंजय शेडगे, पं. स. सभापती मिलींद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, माजी सभापती धर्मराज घोरपडे, दादा शेडगे, अण्णा बापू सावंत, अरुण कापसे, अरविंद चव्हाण अशा सुमारे 25-30 प्रमुख पदाधिकार्यांनी बारामतीत जावून पवारांची भेट घेतली.

शिवेंद्रराजेंच्या गटाचे प्रमुख पदाधिकारी एवढ्या मोठ्या संख्येने भेटायला आल्यामुळे पवारही अचंबित झाले. त्यांनी ‘का आलाय?’ असे विचारले. त्यातच पवारांना भेटीला आलेल्या शिष्टमंडळात बरेच जुने चेहरे दिसले. त्यांनी अभयसिंहराजे भोसले यांच्या आठवणी सांगितल्या. जुन्या-नव्यांचा समेळ शिवेंद्रराजेंनी चांगला साधला आहे, अशी पुस्ती पवारांनी सुरुवातीलाच जोडली. मात्र, होमवर्क करुन गेलेल्या शिवेंद्रराजे गटाने पवारांनाही मुद्यावर आणले. गत लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना सातारा व जावली तालुक्यातून झालेले मतदान आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंना झालेले मतदान याची आकडेवारीच समर्थकांनी समोर मांडली. दरवेळेला आम्ही तुमच्या शब्दाखातर उदयनराजेंचे टिच्चून काम करतो. त्यांची वेळ झाली की ते शिवेंद्रराजेंच्या विरोधात काम करतात हा आजवरचा इतिहास आहे. आत्ताही त्यांचे शहरातील व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते भाजपच्या संभाव्य विधानसभा उमेदवारांचे काम करत आहेत. जावलीत तर एकजण विधानसभेला इच्छुक आहे तो उदयनराजेंच्या गाडीत फिरतो. लोकसभेच्या निवडणुकीनंतर येणार्या विधानसभा निवडणुकीत ते जर त्यांचेच काम करणार असतील तर आम्ही उदयनराजेंचे काम का करावे? असा सवालच या पदाधिकार्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजे आमच्या नेत्याचे काम करणार याची काय गॅरंटी? त्यांच्यामुळे अनेकांना कोर्ट कचेर्या कराव्या लागत आहेत, मनोमीलनातल्या कोणत्याही अटी त्यांनी कधी पाळल्या नाहीत. आम्हाला सातत्याने त्यांचा त्रास होतो. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी सांगितले तरी आम्ही उदयनराजेंचे काम करणार नाही, असेही या पदाधिकार्यांनी पवारांना सांगितले.

शरद पवार यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी राजकीय परिस्थितीही सांगितली. शिवेंद्रराजेंच्या नेतृत्व गुणांचे, संघटन कौशल्याचे व राष्ट्रवादीप्रती असलेल्या निष्ठेचे पवारांनी कौतुक केले. शिवेंद्रराजेंसह सर्व आमदारांना एकत्रित करुन त्यांच्याशी विचार विनिमय केल्याशिवाय आपण कोणताही निर्णय घेणार नाही. तुम्ही म्हणत असाल तर उदयनराजे व शिवेंद्रराजे यांना समोरासमोर घेवून आपण चर्चा करु, अशी ग्वाही पवारांनी दिली. लोकसभेला सातारा व जावली तालुक्यात जेवढी मते उदयनराजेंना पडतील तेवढीच मते शिवेंद्रराजेंना सातारा-जावली तालुक्यातून पडली तरच उदयनराजे आमच्या बरोबर आहेत असे आम्ही मानू, असेही बैठक संपताना पदाधिकार्यांनी सांगितले. त्यावर पवार दिलखुलास हसले.

शिवेंद्रराजेंच्या समर्थकांनी थेट बारामतीत जावून शरद पवारांना भेटत उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध केल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

आज सभापती भवनात महत्वपूर्ण बैठक

शरद पवारांसमवेत झालेली चर्चा व शिवेंद्रराजे गटाने भविष्यात घ्यावयाचा निर्णय याबाबत शनिवारी दुपारी पोवईनाक्यावरील सभापती भवनात जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत उदयनराजेंच्या उमेदवारीवरुन चर्चा केली जाणार आहे.

‘सुरुचि’वर हल्ला करणार्यांचे काम कसे करायचे?

गेली 10 वर्षे राजघराण्याचे मनोमीलन होते. उदयनराजेंना सर्व ठिकाणी मनाने आम्ही पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस जे जे सांगेल ते ते आदेश आमचे नेते व आम्ही पाळले होते. पक्षनिष्ठेच्या विरोधात आम्ही कधीही काहीही केले नाही. उदयनराजेंनी मात्र पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. पक्ष गेला खड्ड्यात अशा प्रकारची विधाने त्यांनी सातत्याने केली आहेत. उदयनराजेंनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम केले आहे.

गेली 2 वर्षे नगरपालिका निवडणूकीपासून आम्ही संघर्ष करत आहोत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही फार मोठे यश मिळवले आहे. सातारा, जावली विधानसभा मतदार संघ कराड उत्तर आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा काही भाग आमच्या कार्यक्षेत्रात येतो. तुम्ही उदयनराजे सोडून जो उमेदवार द्याल त्याला 60 टक्क्याहून अधिक मते आम्ही निश्चितपणे देऊ. मात्र, आमच्या नेत्याचा अपमान करणार्या व सुरूचीवर हल्ला करणार्याचे काम कसे करायचे?कार्यकर्त्यांच्या भावना आमच्या तीव्र आहेत. आम्ही त्यांचा पराभव करून दाखवू, असेही काही पदाधिकार्यांनी संतापाने सांगितले.