Your Own Digital Platform

उकाडा वाढला

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील वातावरणात बदल नोंदविण्यात येत असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात थंडीनंतर कमालीची वाढ झाली असून, कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 20 अंशावर पोहोचले आहे. दिवसा वाहणारे गारे वारे आणि रात्रीच्या हवेतील गारठाही कमी झाला असून, वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांना किंचितशा उकाड्यासह उष्णतेला सामोरे जावे लागत आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. शनिवारसह रविवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31, 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

मुंबईचे किमान तापमान शुक्रवारी 18.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर आणि नाशिक येथे 13.4 अंश नोंदविण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.