आगामी उपमुख्यमंत्री रासपचाच:महासचिव दोडताले
सातारा: आगामी निवडणुकीत 50 आमदार निवडून आणायचे असून राज्याचा पुढील उपमुख्यमंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचाच झाला पाहिजे, या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने तयारीला लागा, असे आवाहन पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडताले यांनी केले. दरम्यान, येत्या 24 फेब्रुवारीला मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या होणार्‍या महामेळाव्यास सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक नागरिक आले पाहिजेत, यासाठी पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

सातार्‍यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यावेळी भाऊसाहेब वाघ, अण्णासाहेब रूपनवर, श्रध्दाताई भातंब्रेकर, उज्वलाताई हाके, कल्पनाताई गिड्डे, काशिनाथ शेवते, बबनदादा विरकर, मामुशेठ विरकर, ऍड. साहेबराव जाधव, खंडेराव सरक, भरत देसाई, श्रीकांत देवकर, प्रकाश खरात, खंडेराव सरक, डॉ.रमाकांत साठे, डॉ.संदिप धुमाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना दोडताले म्हणाले, विधींमडळाच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हा मेळावा आगामी राजकारणाला वेगळे वळण देणारा ठरणार आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न करायचे आहेत. मेळाव्यात धनगर आरक्षणासह इतर प्रश्‍नांची सोडवणूक करायची आहे. कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी केल्यास रासप येत्या काळात राज्यातील दुसरा ते तिसर्‍या क्रमाकांचा पक्ष होईल, असा विश्‍वास दोडताले यांनी व्यक्त केला. तसेच भाजपची गल्ली ते दिल्ली अशी सत्ता असताना देखील त्यांच्या पक्षाने अद्याप मुंबईच्या शिवाजीपार्कवर मेळावा घेण्याचे धाडस केले नाही. शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका असल्यामुळे ते शिवाजी पार्कवर सभा घेत आहेत. त्यांच्या नंतर आता फक्त राष्ट्रीय समाज पक्षाने त्या ठीकाणी मेळावा घेण्याचे धाडसाचे पाऊल उचलले आहे. मेळाव्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून यावेळी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच धनगर आरक्षणाचा निर्णय घेण्यासह ओबीसी आरक्षण मजबूत करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारने बजेटच्या माध्यमातून तरतूद केली असली तरी राज्य सरकारने ही शेतकर्‍यांसाठी तरतूद केली पाहिजे, अशा ठोस मागण्या मांडण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातून बहुसंख्यने नागरिक या मेळाव्याला येवून एक प्रकारची सुनामी सरकारला दाखवून द्यायची आहे. त्यासाठी विशेषत: ना.जानकर यांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक नागरिकांनी मेळाव्याला उपस्थित राहिले पाहिजे, अशी अपेक्षा दोडताले यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षात विविध मान्यवरांनी प्रवेश केला तर सुत्रसंचालन संतोष ठोंबरे यांनी केले.

No comments

Powered by Blogger.