Your Own Digital Platform

उद्यापासून कोरेगांव शिवमहोत्सवाचे आयोजन

कोरेगांव : स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कोरेगांव नगरपंचायतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आयोजित केल्या जाणार्‍या शिवमहोत्सव उपक्रमास उद्या रविवार दि. 17 फेब्रुवारी पासून सरुवात होत असून दि. 19 फेब्रुवारी पर्यंत तिन दिवस चालणार्‍या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन कोरेगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष संजय पिसाळ, मुख्याधिकारी पुनम कदम-शिंदे यांनी केले आहे.

शिवमहोत्सवाचा शुभारंभ रविवारी (दि. 17) रोजी सायं. 6 वाजता रोटरी उद्यानात मुख्याधिकारी पुनम कदम - शिंदे व सर्व महिला नगरसेविकांच्या हस्ते होणार असून याच दिवशी स्थानिक कलाकार व प्राथमिक शाळांचा सहभाग असलेला कोरेगांवची लोकधारा हा सांस्कृतिक उपक्रम होईल. सोमवार दि. 18 रोजी सायंकाळी 6 वाजता रोटरी उद्यानात माध्यमिक व खुल्या गटातील कलाकारांचा सहभाग असलेल्या कोरेगांवची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी तळसंदे (वारणानगर) येथील शामराव पाटील शिक्षण समूहाच्या खेळाडूंच्या चित्तथरारक मल्लखांब कसरती होतील. याच दिवशी सायंकाळी 7 वाजता भव्य मशाल मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंती दिवशी मंगळवार दि. 19 रोजी भल्या सकाळी मान्यवरांच्या व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत स्मारक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक व पुजन होईल, तर याच वेळी तर शिवमहोत्सवाच्या निमित्ताने आकर्षक शिवप्रतिमा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. यात शाळा, संस्थांसह सार्वजनिक मंडळांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. यासाठी रुपये 3000 ते 1501 पर्यंतची पारितोषीके रोख स्वरुपात दिली जाणार आहेत. यंदाच्या महोत्सवात वातावरण निर्मितीसाठीही स्पर्धा आयोजित केली आहे. दुपारी 3 वाजता शाळा नं. 1 येथून भव्य मिरवणूक व चित्ररथ स्पर्धेला आरंभ होईल. दोन गटात होणार्‍या या चित्ररथ स्पर्धेसाठी रुपये 3000 ते 1501 पर्यंतची पारितोषीके व अतिभव्य चषक देण्यात येणार आहेत. सहभागी सर्वच चित्ररथांना प्राथमिक खर्चासाठी 3000 रुपये रोख दिले जाणार आहेत. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रोटरी उद्यानात शिवमहोत्सवात होणार्‍या विविध स्पर्धांचा पारितोषीक वितरण समारंभ माजी जलसंपदा मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते व दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर बाचल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांसह सर्व विद्यालये, स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष संजय पिसाळ, मुख्याधिकारी पुनम कदम-शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी केले आहे.