Your Own Digital Platform

कारवाईसाठी वेळ, जागा तुम्ही ठरवा; मोदींचे सुरक्षा दलांना स्वातंत्र्य

झाशी: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्या, असा संतप्त सूर देशभरातून उमटत असतानाच, दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी वेळ, जागा आणि कारवाईचं स्वरुप कसं असेल आदी सर्व ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य सुरक्षा दलांना दिलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाशी येथील जाहीर सभेत सांगितलं. जवानांनी देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलं आहे. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. पुलवामा हल्ल्यातील दोषींना शिक्षा मिळणारच, असं सांगत मोदींनी दुसर्‍या सर्जिकल स्ट्राइकचे संकेत दिले.

झाशीत जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणारच, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. ’संपूर्ण देश दुःखात बुडालेला आहे. तुमच्या सर्वांच्या भावना मी समजू शकतो. लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानची अवस्था वाईट केली आहे. मोठमोठ्या देशांनी संबंध तोडले आहेत. पाकिस्तानवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आणली आहे,’ असं मोदींनी सांगितलं.

सुरक्षा दलांना पुढील कारवाईसाठी जागा, वेळ आणि स्वरुप ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.

’सुरक्षा दलांना पुढील कारवाई करण्यासाठी वेळ काय असेल, जागा आणि स्वरुप काय असेल हे निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. अशा प्रकारचे हल्ले करून भारताला उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. पण त्यांचे हे मनसुबे देशातील 130 कोटी जनता एकत्रितपणे उधळून लावेल. त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल,’ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.