विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेवर विश्‍वास ठेवला पाहिजे: पालकमंत्री
सातारा: आपण शिक्षणाला विज्ञानाची जोड देणे आवश्यक असून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ठरवलेले ध्येय गाठू शकतो, यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या नकारात्मक भावनांवर मात करुन आपल्या क्षमतेवर विश्‍वास ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी केले.

राष्ट्रीय उच्चतम शिक्षा अभियान अंतर्गत इंटरप्रेनरशिप सेल स्कील हबचा पायाभरणीचा शुभारंभ श्रीनगर, जम्मू काश्मिर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाला. त्याचे थेट प्रेक्षपण आज येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील सभागृहात दाखविण्यात आले. यानंतर महाविद्यालयात रुसा अंतर्गतच्या उद्योजकता विकास कौशल्य केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, महाविद्यालयाचे प्राचार्य पी.एस. गायकवाड आदी उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्था हे मुलांना काय हवे, काय नको हे पाहून संवेदनशीलपणे काम करत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. शिवतारे पुढे म्हणाले, जागतिकीकरण झाले असून आता शिक्षणात मोठे बदल झाले आहेत. शिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, हे बदल लक्षात घेवून रयतनेही तसे बदल केले आहेत. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत रयतच्या महाविद्यालयांचा समावेश झाला आहे. याबद्दल मी अभिनंदन करुन रयत शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रात देशाला दिशा दर्शक काम करेल, असा विश्‍वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या पी.एस. गायकवाड यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.