कचरा डेपोत गेलेले पैसे परत

सातारा:सातारा शहरातील सदर बझार येथील एका महिलेने घरातील कचर्‍याच्या डब्ब्यात घाईघाईने कचरा समजून पैशाचे पाकीट टाकले व हा कचरा गोळा करून कचरा गाडी घेऊन गेली. पण, नशीब चांगले असल्याने कचरा डेपोतून रोख वीस हजार रुपये मालकीणीला परत मिळाले.
याबाबत माहिती अशी की, शाळगाव जि. सांगली येथील बाळकृष्ण मोहिते हे मुलांच्या शिक्षणासाठी सातार्‍यातील सदर बाजार परिसरात कुटूंबियांचे समवेत राहतात. काल सकाळी दहा वाजता कचरा गाडी आली म्हणून त्यांच्या पत्नी सौ सविता यांनी घाईघाईने कचरा समजून एक पाकिट घरातील कचर्‍याच्या डब्ब्यात टाकले व डब्बा कचरा गोळा करणार्‍या कचरा गाडीत रिकामा केला. त्यानंतर त्यांनी मुलाच्या शाळेत फी भरण्यासाठी ठेवलेले वीस हजार रुपये कुठे ठेवले?याचा शोध घेत होते. तोपर्यत कचरा गोळा करून कचरा गाडी सोनगाव ता. सातारा येथे असलेल्या कचरा डेपोला पहचली होती.
आपण घाईघाईत कचर्‍याच्या डब्ब्यात पैशाचे पाकिट टाकले असावे अशी शंका उपस्थित करून सौ. सविता मोहिते यांनी तातडीने स्थानिक नगरसेवक विशाल जाधव यांच्याशी संपर्क साधला व कचरा गाडी चालवत असलेल्या व्यक्ती बद्दल माहिती घेतली. आणि त्वरित कचरा गोळा करणार्‍या गाडीचे मालक व ठेकेदार सागर माने यांच्याशी संपर्क साधला. त्यांना त्याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी गाडीतून आणलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यातून नीट लक्ष पूर्वक तपासणी करून वीस हजार रुपयांचे पैशाचे पाकिट शोधून ते सौ. मोहिते यांना परत केले.
यामुळे काळजीत पडलेल्या मोहिते कुटुंबातील लोकांना दिलासा मिळाला. आजही सातार्‍यात प्रामाणिकपणा शिल्लक आहे याची खात्री पटली असून सागर माने यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सदर बाजार येथील भारतमाता मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.