निवडणुकांच्या पार्श्‍वभुमीवर अधिकार्‍यांच्या होणार बदल्या
सातारा : मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी म्हणून काम केेलेले, स्वजिल्हा, जिल्ह्यात मागील 4 वर्षांत 3 वर्षे कार्यरत असलेल्या खंडाळा, कोरेगाव, फलटण, कराड तसेच वाई तहसीलदारांच्या बदल्या होणार आहेत. विशेष भूसंपादन अधिकारी अरविंद कोळी यांनाही जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणूकही जवळ येऊन ठेपली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करू लागली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आढावे आणि निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून निवडणूक आयोगाने काही नियम घातल्याने महसूल अधिकार्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामध्ये 7 तहसीलदार आणि एका उपजिल्हाधिकार्याचा समावेश आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात निवडणुकीचे काम केलेल्या अधिकार्यांच्या बदल्यांचे निकष निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कोणत्या निकषानुसार अधिकारी बदलीस पात्र ठरतात त्याचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवला आहे. त्यानुसार भूसंपादन शाखा क्र. 4 चे विशेष भूसंपादन अधिकारी अरविंद कोळी यांची बदली होणार आहे. कोळी हे कराड तालुक्यातील सुपने गावचे आहेत. स्वजिल्हा म्हणून त्यांची बदली करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार अमिता तळेकर

या सातार्‍यातील असल्याने स्वजिल्हा म्हणून त्यांचीही बदली होणार आहे. कोरेगाव तहसीलदार स्मिता पवार सुमारे पंधरा वर्षे जिल्ह्यात आहेत. नायब तहसीलदार म्हणून त्यांनी कोरेगाव तसेच सातारा याठिकाणी पूर्वी काम केले आहे. जिल्हा पुनर्वसन विभागात तहसीलदारपदी काम केल्यावर त्यांची कोरेगाव तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली. गेल्या चार वर्षात त्या जिल्ह्यात 3 वर्षे कार्यरत आहेत. त्यामुळे पवारांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. जिल्हा पुनर्वसन विभागातील तहसीलदार जगदीश निंबाळकर तसेच वाईचे तहसीलदार रमेश शेंडगे हेही गेली चार वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहेत. शेंडगे पूर्वी महाबळेश्‍वरला तहसीलदार होते. वर्षापूर्वीच त्यांनी वाई तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारली होती. खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव तसेच कराडचे तहसीलदार राजेश चव्हाण हे मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांनी नोडल ऑफिसर म्हणूनही काम पाहिले आहे. जाधव यांनी पूर्वी फलटणला तहसीलदार म्हणून तर जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन तहसीलदारपदी काम केले आहे. तर चव्हाण हे वर्षापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातून बदलीने कराडला तहसीलदारपदी रुजू झाले होते. मात्र त्यापूर्वी त्यांनी सातारा तहसीलदार म्हणून काम पाहिले होते. फलटणचे तहसीलदार विजय पाटील यांचा कार्यकाल पूर्व होत असल्याने त्यांची बदली होणार आहे.

No comments

Powered by Blogger.