फसव्या मेसेजपासून रहा सावध
सातारा : सध्या सोशल मीडियाच्या विश्‍वासार्हतेबद्दल कुणीही खात्री देत नसताना आता टेक्स्ट मॅसेजवर पैशाचे अमिष दाखवणार्या एका मॅसेजने चांगलाच खैंदूळ घातला आहे. त्यामुळे नेटकर्‍यांना दिलासा मिळण्याऐवजी धास्तीच लागून राहिली आहे. संबंधित मॅसेजसाठी अ‍ॅप डाऊनलोड करावयास व लिंक क्लिक करण्यास सांगण्यात येत असून तसे केल्यास मोबाईलची संपूर्ण माहिती व डाटा संबंधिताला समजण्याची शक्यता आहे. त्याद्वारे बँकिंग डिटेल्स संबंधितांना समजू शकणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या फसव्या मॅसेजपासून सावध राहण्याचे आवाहन सोशल मीडियावरुन केले जात आहे.
सोशल मीडियामुळे नेटकर्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून त्यातून अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. हॅकर्सच्या करामती तर आता सर्वांनाच ज्ञात झाल्या असल्या तरी फसवणुकीचे व गंडा घालण्याचे प्रकार काही केल्या कमी होत नाहीत. सोशल मीडिया व नेटवर दररोज फसवणुकीचे नवनवे फंडे निर्माण होत आहेत. आता तर गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मोबाईलवर तुमचा मित्र अमूक यांच्याकडून तुमच्या खात्यावर काही रक्कम जमा झाल्याचे टेक्टस् मेसेज  येत आहेत. तर वॉटस्अ‍ॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्रामवरही असे फेक  मॅसेजेस व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेटकर्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्रुपवर तुमचा मित्र अमूक याच्याकडून तुमच्या अकाऊंटवर  अमूक एक रक्कम  जमा करत असून ती रक्कम काढण्यासाठी दिलेली लिंक ओपन करा, असे सांगितले जात असून संबंधित अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिली जात आहे.  ही लिंक ओपन केल्यावर  कोड टाका असेही  सांगितले जात आहे.  या  मॅसेजमध्ये कधी आपल्या ओळखीच्या व्यक्तींची नावे येतात तर काहींमध्ये अनोळखी व्यक्तींची नावे असतात. ओळखीची नावे असल्यास नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी काही जण  या लिंकवर क्लिक करुन पाहत आहेत.  मात्र ही लिंक ओपन केल्यास तुमच्या बँक अकाऊंटशी सदर मोबाईल नंबर लिंक असल्याने तुमचे बँकिंग डिटेल्स संबंधितांना समजू शकतात.  तेव्हा या लिंक ओपन करु नयेत असे जनजागृतीपर मॅसेजही आता सोशल  मीडियावर फिरु लागले आहेत. मात्र यामध्येही बराच संभ्रम निर्माण होत आहे.
पैसे जमा होत असल्याचा हा मॅसेज पूर्णपणे फेक असून नेटकर्‍यांनी सावध होण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठी सध्या सोशल मीडियावर नेटकर्यांना जागरुक राहण्याचे आवाहन केले जात आहे. असे जागृतीपर मॅसेज व्हायरल होत असून यापासून सावध राहण्यासाठी कशी दक्षता घ्यावी हेही सांगितले जात आहे. त्याखाली कधी मुंबई पोलिस, कधी नागपूर पोलिस असा संदर्भ येत आहे. एकूणच या सार्या प्रकारामुळे  नेटकर्यांमध्यही संभ्रम निर्माण झाला आहे. सायबर पोलिस व संबंधित यंत्रणांनी याबाबत ठोस कारवाई करण्याची व मॅसेजबाबत स्पष्टता देण्याची  मागणी जोर धरु लागली आहे.

No comments

Powered by Blogger.