Your Own Digital Platform

‘महाराजांची राजचिन्हे व अजरामर शस्त्रे’ पुस्तकाचे प्रकाशन

‘महाराजांची राजचिन्हे व अजरामर शस्त्रे’ पुस्तकाचे प्रकाशन करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. समवेत पोपटराव बर्गे, अभिजीत बेडके, रोहित वाकडे, प्रशांत धनावडे, विक्रम निंबाळकर.

फलटण : येथील इतिहास अभ्यासक पोपटराव बर्गे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजचिन्हे व शस्त्रात्रे यांची संचित्र स्वरुपात माहिती संकलित केलेल्या ‘महाराजांची राजचिन्हे व अजरामर शस्त्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच सातारा येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते तर वाई येथे प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात संपन्न झाले.

यावेळी संदिप कोंडे-देशमुख, प्रशांत धनवडे, अभिजीत सूर्यवंशी, रोहित वाकडे, सचिन भगत, नितीन रणवरे, विक्रमसिंह निंबाळकर, विशाल पवार, उमेश शिंदे (रत्नागिरी), यशवंतराव लेले (वाई), विवेकदादा भोसले, तेजसिंह मांढरे, चंदन पवार, पवन बर्गे यांची उपस्थिती होती.

शिवरायांच्या अलौकीक कार्याला उजाळा : खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे

छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या सहकार्याने हिंदवी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले. पोपटराव बर्गे यांनी शिवरायांच्याप्रती असलेल्या प्रेमादरामुळे अत्यंत मेहनतीने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकामुळे शिवरायांच्या अलौकीक कार्याला उजाळा देण्याचे काम बर्गे यांनी केले असल्याचे सांगून पुस्तकातील रेखाचित्रे पाहून ‘डोळ्याचे पारणे फेडले’ अशी भावूक प्रतिक्रिया खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली.

अभ्यासकांसाठी उपयुक्त पुस्तिका : श्रीमती विजयाताई भोसले

शिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी जी राजचिन्हे त्या पवित्र सोहळ्याचे महत्त्व दर्शवित होती, त्या राजचिन्हांविषयी जनसामान्यांना विशेष माहिती नसते. या पुस्तकाच्या माध्यमातून राजचिन्हांची व शिवकालीन शस्त्रांची माहिती उपलब्ध करुन देण्याचे काम झाले असून ही पुस्तिका अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे, असे श्रीमती विजयाताई भोसले यांनी सांगीतले.

पोपटराव बर्गे यांनी पुस्तक निर्मितीबाबतची भूमिका स्पष्ट केली. अभिजीत सूर्यवंशी यांनी स्वागत केले. तर विशाल पवार यांनी आभार मानले.