Your Own Digital Platform

अंतर्गत गटबाजी थांबवा नाहीतर राजीनामा द्या ; "भावाचा" वाईटपणा घेवून निवडून आणलय; : उदयनराजे
स्थैर्य, सातारा :तुम्हाला सर्वांना निवडून आणण्यासाठी "भावाचा " वाईटपणा घेवून सर्वसामान्य म्हणून तुम्हाला नगराध्यक्ष केले. कामे करण्यासाठी जनतेनी निवडून दिले आहे. माझी खासदारकिची निवडणूक आली तरी तुमचे गटबाजीचे राजकारण अजून सुरुच आहे. मी तुम्हाला निवडून आणण्यासाठी रक्‍ताचे पाणी केले. तुम्हाला सर्वांना एकमेकांना विश्वासात घेऊन काम करायला जमत नसेल तर सर्वांनी राजीनामा द्यावेत, असे खडेबोल सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सभापती व नगरसेवक, नगरसेविका यांना सुनावले.

सातारा नगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा झाली. या सभेत उपनगराध्यक्ष तसेच बांधकाम सभापतींचे विषय मंजूरीला घेतले नाहीत. त्यामुळे उपनगराध्यक्ष, सभापती यांनी या सभेवर बहिष्कार घातला. सत्‍ताधारी गटातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली. त्या पार्श्‍वभूमीवर खा. उदयनराजे यांनी सातारा विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांची तातडीने बैठक हॉटेल राजतारा येथे बोलावली होती.

खा. उदयनराजे म्हणाले, या पूर्वी मी गटबाजी संदर्भात बैठक घेऊन आपापसातील वाद मिटवून जनतेची कामे करा असे सांगितले होते. माझी निवडणूक आली तरीही तुमचे सर्वांचे गटबाजीचे राजकारण चालूच आहे. नगरसेवकांनी सांगितलेल्या कामांच्या विषयावर स्वाक्षर्‍या केल्या जात नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या आहेत. तुम्हाला गटाबाजीचे राजकारण करण्यासाठी निवडून आणले नाही. तुम्हाला नगराध्यक्ष व नगरसेवक पदावर निवडून आणण्यासाठी आणण्यासाठी मी माझ्या "भावासह" सगळ्यांचा वाईटपणा घेतला आहे. याचा विसर पडला आहे का? त्यांना नगराध्यक्षपद देवून मोकळा झालो असतो तर फार बरे झाले असते. गटबाजीचे राजकारण तर बघायला मिळाले नसते. वाद करु नका, सर्व नगरसेवकांची कामे करा. तुम्हाला सातारच्या सगळ्या जनतेने मते दिली आहेत. तुम्हाला ठराविक जणांची कामे करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेले नाही. संपूर्ण सातारा शहर आपले आहे असे मानून तुम्ही काम केले पाहिजेत. पालिकेत गटाबाजीचे राजकारण करण्यासाठी निवडून दिलेले नाही. सर्वांना सोबत घेवून नगराध्यक्षपदी तुम्हाला काम करायचे आहे. स्थायी समितीसाठी 500 विषय आले तरी तातडीने पुढील बैठक बोलावून नगरसेवकांचे उर्वरित विषय मंजुरीसाठी घ्या. यामध्ये नगर विकास आघाडीसह भाजप नगरसेवकांचे सर्व विषय त्यामध्ये घ्या. विषयपत्रिकेवर ५०० विषय झाले तरी चालतील. आणि तुम्हाला जमत नसेल तर लगेचच राजीनामा द्या, अशी मागणीही उदयनराजे यांनी बैठकीत केली

या बैठकीस उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी बनकर, सभापती श्रीकांत आंबेकर, यशोधन नारकर, मनोज शेंडे, स्नेहा नलावडे आदि नगरसेवक उपस्थित होते. मात्र, प्रतोद निशांत पाटील, सभागृह नेत्या स्मिता घोडके, वसंत लेवे, लता पवार अनुपस्थित होते.

दरम्यान बैठकीतून बाहेर जाताना नगराध्यक्षा माधवी कदम यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. सगळ्या नगरसेवकांचे विषय मी पुढच्या बैठकीला घेतले आहेत, असे त्यांनी बैठकीत सांगितले. मात्र त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. यावेळी नगराध्यक्षा तसेच उपनगराध्यक्षांमध्ये वाद झाला. बैठकीनंतर नगराध्यक्षांनी उपनगराध्यांना खडेबोल सुनावले. खोटे सांगून महाराजांचे सांगून कान तुम्ही भरता. तुम्हाला माझा राजीनामा पाहिजे ना, मी तो देते पाठवून, असे ठणकावून सांगत नगराध्यक्षा तडक बाहेर पडल्या. पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीमधील उफाळून आलेल्या वादाच्या राजकारणाची चर्चा साताऱ्यात रंगली आहे.