Your Own Digital Platform

सुशांत अणवेकर यांची सायकल मोहिम आदर्शवत: आ. शिवेंद्रसिंहराजे

सुशांत अणवेकर यांचा सत्कार करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. 


सातारा: दुर्गसंवर्धन आणि निसर्गसंवर्धन ही काळाची गरज आहे. यासाठी अनेक लोक विविध उपक्रम राबवतात आणि जनजागृतीही करतात. येथील सुशांत अणवेकर यांनी दुर्गसंवर्धन आणि निसर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सायकलवरुन ट्रान्स सह्याद्री ही 3 हजार किलोमीटर पेक्षाही जास्त अंतर प्रवासाची मोहिम हाती घेतली असून त्यांची ही सायकल मोहिम आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

कारवार (कर्नाटक) येथील सुशांत अणवेकर या युवकाने 2 फेब्रुवारीला सापुतारा (गुजरात) येथून ट्रान्स सह्याद्री या मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेत ते संपुर्ण सह्याद्री फिरणार असून ते सह्याद्रीच्या रांगेतील सर्व गिडकिल्ल्यांवर जावून जनजागृती करत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळातील सर्वाच्च शिखरांवरही ते जाणार आहेत. दुर्गसंवर्धन आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देत ते ठिकठिकाणी लोकांची भेट घेणार असून आतापर्यंत त्यांनी हातगड, अहिवंतगड, रामसेज, मोरधन, हरिश्चंद्र गड, शिवनेरी, सरसगड, रायगड, प्रतापगडवर चढाई करुन नुकतीच त्यांनी अजिंक्यताराला भेट दिली. यानंतर त्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेवून सज्जनगडापासून पुढील प्रवास सुरु केला.

दरम्यान, या अभिनव आणि आदर्शवत उपक्रमाबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अणवेकर यांचा सत्कार करुन कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मारली आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी अमोल मेणकर, मंदार मेणकर, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.