Your Own Digital Platform

सातारा पालिकेच्यावतीने आयोजित ‘शिवजयंती महोत्सवा’चा शाही थाटात प्रारंभ

मंगळवार 19 रोजी शाही पद्धतीने भव्य मिरवणूक

सातारा: सातारा पालिकेच्यावतीने आयोजित ‘शिवजयंती महोत्सवा’चा शाही थाटात प्रारंभ रविवारपासून झाला. गांधी मैदानावर सायंकाळी 7 वाजता ‘एक झुंज वादळाशी’ या नाटयाचा प्रयोग पाहण्यासाठी राजधानी सातारकरांनी गर्दी केली होती. दरम्यान, शाही शिवजयंती महोत्सवात यावर्षी दि. 18 ते 22 या कालावधीत शालेय पोवाडे, कीर्तन, भव्य मिरवणूक, मर्दानी खेळ, भव्य शस्त्रप्रदर्शन आदींचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, कला, क्रीडा व सांस्कृतिक प्रमुख सुजाता राजेमहाडिक यांनी दिली आहे.

सातारा पालिकेच्यावतीने दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी शाही पद्धतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ रविवारी सायंकाळी गांधी मैदान येथे महानाटयाने करण्यात आला. या महानाटयातील सादरीकरणाने अंगावर रोमांच फुलत होते. सातारकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या नाटकातून पाहण्यासाठी गर्दी केली होती. सोमवारी 18 रोजी गांधी मैदानावर सायंकाळी 5 ते 8 यावेळेत शालेय पोवाडे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी जुन्या नगरपालिकेच्या इमारतीत भव्य शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर मंगळवार 19 रोजी शाही पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचा प्रारंभ राजवाडा येथून होणार आहे. कमानी हौद, खालच्या रस्त्याने शिक्षक बँक ते शिवतीर्थ अशी काढण्यात येणार आहे. यामध्ये जानकीबाई शाळेचे विद्यार्थी बेलवडीच्या मल्लम्मा देसाईचा सन्मान करताना छत्रपती शिवाजी महाराज, आबासाहेब चिरमुले विद्यालयाचे विद्यार्थी लोककल्याणकारी राजा, नूतन मराठी शाळेचे विद्यार्थी पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची भेट, सातारा पालिका शाळा क्रमांक 2,6,7 आणि 25 विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, शाळा क्रमांक 23 चे विद्यार्थी पावनखिंडीतील पराक्रम, बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज, नवीन मराठी शाळा खडकेश्वर व महिला मंडळ पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांची भेट, अण्णासाहेब कल्याणी प्रायमरी स्कूल सातारचे विद्यार्थी मुरारबाजी आणि दिलेरखान युद्धप्रसंग असे दहा चित्ररथ सहभागी होणार आहे. या मिरवणुकीत ढोलपथक मुख्य आकर्षण असणार आहे.