Your Own Digital Platform

वेगळा निर्णय घेऊ पाहणार्यांचा मुहूर्त कधी?

लोणंद : खंडाळ्यातील काँग्रेस एकसंध नसून ज्यांच्यासाठी आर्थिक सत्ता निर्माण केल्या तेच विरोधात जाऊ लागले आहेत. खंडाळ्याचा कारखाना उभा करताना सर्वतोपरी मदत आम्ही केली होती. पण, त्यानंतर त्यांना तो चालवता आला नाही. ज्यांच्याकरता आम्ही आर्थिक सत्ता निर्माण केल्या तेच आता वेगळा निर्णय घेऊ पाहत आहेत. त्यांनी कोणता मुहूर्त काढला आहे? असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी किसन वीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांना उद्देशून लगावला.

लोणंद येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आ. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. चव्हाण म्हणाले, काँग्रेस एकसंध असताना स्वतंत्रपणे निर्णय घेता येत होते. त्यामुळेच आपणाला दिल्लीत चांगले काम करता आले. पण, काँग्रेस पक्ष ज्येष्ठ आहे. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर काँगेस विभागून निम्मी-निम्मी झाली आहे. आता निवडणुकीच्या वेळी अडचण येत आहे. दोन्ही काँग्रेसमधील गटबाजी हळू हळू दूर होईल. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर राष्ट्रवादीला काँग्रेसने व काँग्रेसने राष्ट्रवादीला मतभेद विसरून साथ द्यावीच लागेल. तसं झाल नाही तर राष्ट्रवादी बरोबर काँग्रेसचेही नुकसान होणार आहे.

जे सहकारात आहेत त्यांना काँग्रेसची सत्ता नसल्याचे चटके बसलेत. त्यामुळे सहकारातील लोक दोन निर्णय घेत आहेत. काही जण भाजपाशी हातमिळवणी करुन भाजपमध्ये जात आहेत. भाजप टिकलं तर आपल काय होईल म्हणूनही काही जण निर्णय घेत आहेत, असेही ते म्हणाले.

मदनदादांची काँग्रेसच्या मेळाव्याकडे पाठ

लोणंद येथील काँग्रेस कार्यकर्ता व शेतकरी संवाद मेळाव्याकडे माजी आमदार मदन भोसले, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, सातारा लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल घाडगे, नगरसेवक अ‍ॅड. पी. बी. हिंगमिरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र कदम, माजी पं. स. सदस्य बापूराव धायगुडे यांच्यासह विविध पदाधिकार्यांनी पाठ फिरवली. या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. काही दिवसांपासून मदन भोसले यांची भाजपशी वाढत चाललेली जवळीकतेची त्याला किनार असल्याचे बोलले जात असतानाच प्रवेश कधी याचीच चर्चा नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. यासाठीच मदन भोसले यांनी रविवारी वेळे येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावल्याचे सांगण्यात येत आहेे.