पाणी टंचाईचे तहसीलदारांनाच गांभीर्य नाही


गोंदवले: गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव दिल्यानंतर माणच्या तहसीलदारांनी टंचाईची स्थळ पाहणीसाठी गाडीतून न उतरताच केली. केवळ पाच मिनिटात सर्व्हे पूर्ण करून अधिकारी निघून गेले. असा अजब सर्व्हे करून तहसीलदार गोंदवलेतील पाणी टंचाई गांभिर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र असलेल्या गोंदवले बुद्रुकला आंधळी तलावातून पाणीपुरवठा सुरू होता. परंतु, तलाव कोरडा पडल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे इतर पर्याय नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. परंतु, गावात पाण्याची होणारी टंचाई पाहून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी स्वतःची विहीर उपलब्ध करून दिल्याने काही अंशी मात करण्यात आली. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते अंगराज कट्टे यांनीही स्वखर्चातून छोटा टँकर दिला आहे. परंतु, ठोस उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे विहीर,बोअर अधिग्रहण व टँकरचा प्रस्ताव दिला होता. पण तहसीलदारांनी पाणी असलेल्या भागातील पाहणी करून गावात मुबलक पाणी असल्याचा चुकीचा अहवाल दिला व हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर गावातील महिलांनी पाण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणार्‍या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेतली.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तातडीने गोंदवलेला टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु तहसीलदार मॅडमनी हा आदेशही धुडकावून ग्रामपंचायतीला दुसरा प्रस्ताव देण्याबाबत सूचना केल्या. त्याप्रमाणे टँकर मागणीचा नवा प्रस्ताव पाठवण्यात आला.त्यानुसार त्यानंतर गटविकास अधिकारी जी. डी. शेलार व तहसीलदार बी. एस. माने हे संबंधित अधिकार्‍यांसह पाणीटंचाई भागाची पाहणी करण्यासाठी आले. पण पाच मिनिटात ही पाहणी पूर्ण करून दौरा संपवून हे अधिकारी निघून गेले. प्राथमिक सर्व्हे स्थळ पाहणी करुन करायचा असतो मात्र गाडीत बसून केलेला सर्व्हे कोणत्या पध्दतीचा आहे. या प्रकाराने ग्रामस्थांमधून संतापजनक नाराजी व्यक्त होत असून लवकरात लवकर प्रशासनाने पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत.

No comments

Powered by Blogger.