Your Own Digital Platform


... तर पक्षाचा आदेश मानणार नाही: समशेरसिंह

स्थैर्य, फलटण : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जर काँग्रेस पक्षाने आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. संपूर्ण राज्यात काँग्रेसची राष्ट्रवादी व इतर मित्र पक्षांबरोबर आघाडी झाली आहे. परंतु फलटण नगरपरिषदेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आम्हाला विचारात न घेता बरीच कामे उरकून घेतात. शहरातील कार्यक्रमाचे निमंत्रणही आम्हाला देत नाही. अशा पक्षाचा प्रचार करण्यास जरी पक्ष श्रेष्ठींनी सांगितले तरी पक्षाचा आदेश मानणार नाही असे स्पष्ट मत फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

या वेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेचे गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके), सचिन अहिवळे, सौ.मीना नेवसे, श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. ज्योती खरात, सौ. रश्मी नाईक निंबाळकर, सौ. मदलसा कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

समशेरसिंह म्हणाले, नगरपालिकेतील सत्ताधारी हे गोरगरिबांना छळनारे असून ह्या सत्ताधारी मंडळींनी प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केला आहे. अशी कोणतीही गोष्ट नसेल की त्यात भ्रष्टाचार नसेल. आता भूमिपूजन व उद्घाटन केलेल्या कामांना स्थगिती देणे गरजेचे आहे. सत्तेपासून पैसा व पैशापासून सत्ता अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण सत्ताधारी करत आहेत. या मंडळीबरोबर आपण मनापासून प्रचार करू शकत नाही, असेही समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

शहरातील ओपन स्पेस मध्ये बांधकाम केले असल्याचे नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून देऊनही सत्ताधारी व अधिकार्‍यांनी त्या जागेत बांधकाम परवानगी दिली आहे. या बाबत उच्च ज्ञायालयात याचिका दाखल केली असून येत्या 25 तारखेपासून आमच्या पार्टीचे सर्व नगरसेवक ह्या सत्ताधार्‍यांविरोधात अधिकार गृहासमोर उपोषणाला बसणार आहे. जो पर्यंत बेकायदेशीर बांधकामावर हातोडा चालवत नाहीत तो पर्यंत उपोषणावरून उठणार नसल्याचे काँग्रेस पक्षाचे गटनेते अशोकराव जाधव यांनी सांगितले.

ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी ज्या कामाचे टेंडर झाले नाही अशा कामांचेही भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले आहे. नगरपालिकेमधील विरोधी पक्ष नेता व काँग्रेस पक्षाच्या गटनेत्यालाही शहरातील एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची पत्रिका नाही. आगामी काळामध्ये सत्ताधार्‍यांचे अनेक घोटाळे बाहेर काढणार असल्याचे नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी सांगितले.

आभार नगरसेवक सचिन अहिवळे यांनी मानले.