Your Own Digital Platform

कार्यकर्त्यांबद्दलच्या अविश्वासाने पवारांकडून घरातच उमेदवारी

माढयात आम्हीच जिंकू -चंद्रकांत पाटील

स्थैर्य, कराड: शरद पवार यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांबद्दल विश्वासच राहिलेला नाही, त्यामुळे ते घरातच उमेदवारी देत सुटले आहेत. माढयातून पवार स्वत: किंवा त्यांचा कोणीही उमेदवार असलातरी भाजपचाच उमेदवार जिंकणार असल्याचा दावा करताना, मात्र विरोधकांचा उमेदवार कोण? यावर माढयातील भाजपचा उमेदवार ठरणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजप-सेना युतीचा निर्णय आठवडयाभरात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बारामती, मावळ पाठोपाठ आता माढयातही पवार कुटुंबातील नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत असल्याने त्याचा धागा पकडत पाटील म्हणाले, की या प्रत्येक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. यातील अनेकजण इच्छुकही होते. मात्र पवारांचा त्यांच्याच कार्यकर्त्यांवर विश्वासच राहिलेला नाही, त्यामुळे ते घरातच उमेदवार्‍या देत सुटले आहेत.

पाटील म्हणाले, की पवारांची तब्येत आणि वयोमान पाहता त्यांनी निवडणूक न लढण्याचा सल्ला आपण दिला होता. पण, तो त्यांना आवडला नाही. आपण सल्ला देण्याची गरज नसल्याचे पवारांनी सूचवले होते. पण, या वयात लोकसभेच्या मतदारसंघात फिरणे त्यांना शक्य होणार नाही, असे आपल्याला वाटत असल्याचे चंद्रकांतदादांनी सांगितले. माढा मतदार संघातील आपला उमेदवार कोण? यावर बोलताना ते म्हणाले, की राजकारणातील गणितं लगेचच उघड केली जात नाहीत. विरोधकांचा उमेदवार कोण यावर आमचा अर्थात युतीचा उमेदवार निश्चित होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या माढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व भाजपविरोधी आघाडीचे वजनदार नेते शरद पवार हे लढण्याची शक्यता असल्याने पवारांना माढा मतदारसंघातच खेळवून ठेवण्यासाठी भाजपने लक्ष केंद्रित केल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. परवा कराड येथेच राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही माढयात भाजपच जिंकणार असल्याचा ठाम आत्मविश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला होता. शरद पवार असो वा त्यांचा कोणीही उमेदवार माढयातून लढला तरी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच जिंकेल, असे देशमुख म्हणाले होते. आज चंद्रकांत पाटलांनीही माढयातून भाजप उमेदवाराच्या जिंकण्याचा दावा केल्याने भाजपने माढा मतदारसंघ लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, भाजपचे सहकारी मित्र असलेल्या राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते व राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी माढयातून शरद पवारांविरोधात लढून विजयाची खात्री व्यक्त केली आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत राहिला आहे.