झाशीच्या राणीचा इतिहास:मणिकर्णिका

झाशीच्या राणीचा इतिहास, तीने गाजवलेलं शौर्य आपण यापूर्वी काही चित्रपट आणि मालिकांमधून पाहिलं आहे. इतिहासाचं हे पान विविध माध्यमातून आपल्यापुढं आलं आहे. ‘मणिकर्णिका’ हा सारा प्रवास भव्यदिव्य पद्धतीने पडद्यावर साकारतो.

व्यावसायिक चौकटीत राहून ऐतिहासिक चरित्रपट निर्माण करणं म्हणजे खरं तर तारेवरची कसरत असते. ऐतिहासिक नोंदींचा आधार घेत, तथ्याशी फारकत न घेता प्रेक्षकाला दोन-अडीच तास बांधून ठेवणं हीदेखील अवघड गोष्ट. अर्थात या बांधून ठेवण्यासाठी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ नावाची गोंडस संकल्पना आपल्याकडं तयार असल्याने म्हणजे आपणच ती ‘विकसित’ केली असल्याने त्याच्या नावाखाली सारं काही चालून जातं आणि मग इतिहासाची तोडफोड करून एक व्यावसायिक सिनेमा साकारला जातो. इतिहासातील अशा अनेक व्यक्तिरेखांवर सिनेमा करण्याचा एक ट्रेंडच सध्या आपल्याकडे आहे. इस्ट इंडिया कंपनीविरोधात एल्गार पुकारणार्‍या आणि स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा अध्याय असलेल्या झाशीच्या राणीचा धगधगता इतिहास ‘मणिकर्णिका’ पडद्यावर मांडतो. अर्थात तोही व्यावसायिक चौकटीत राहूनच. त्यामुळे त्यात लेखक-दिग्दर्शकाकडून काही अक्षम्य चुका होतात, प्रमुख व्यक्तिरेखेला फायरब्रँड नायिका करण्याचा प्रयत्नही केला जातो, मेलोड्रामाचा वारंवार आधार घेतला जातो. मात्र, असं असूनही ‘मणिकर्णिका’ एकदा पाहावा असा आहे. डोळे दिपवून टाकणारा डोलारा उभा करताना तो सशक्त, सजीव आणि क्लासिक अनुभव देत नाही, हेदेखील खरंच.

सिनेमासाठी आखलेली चौकट काहीशी अशी, बिठूरमध्ये पेशव्यांची दत्तककन्या असलेल्या मणिकर्णिकेला लहानपणापासून सौंदर्य आणि साहसाचे जणू वरदानच आहे. झाशीचे राजा गंगाधरराव यांच्या विवाहासाठी मनूला मागणी घातली जाते आणि ती झाशी साम्राज्याची सून होते. राजाकडून राणी लक्ष्मीबाई असे तिचे नामकरण केले जाते. पुढे लहान बाळ आणि पतीच्या मृत्यूनंतर ती झाशीच्या गादीवर बसते आणि थेट इस्ट इंडिया कंपनीविरोधात एल्गार पुकारते. इंग्रजांविरोधात 1857 मध्ये सशस्त्र लढा पुकारला जातो. झाशीची राणी त्यात सक्रिय सहभाग घेते. या प्रवासात तिचे घरचे तिच्या विरोधात जातात, तर इतर अनेक जण तिला मदत करतात. गौस खान (डॅनी डेंग्जोपा) यांची स्वामिनिष्ठा, झलकारीबाई (अंकिता लोखंडे) यांची मदत, तात्या टोपे (अतुल कुलकर्णी) यांचे मार्गदर्शन असे अनेक टप्पे यामध्ये येतात. झाशी इंग्रजांनी ताब्यात घेतल्यानंतर ग्वाल्हेरमध्ये मराठा साम्राज्याच्या निर्माणासाठी केलेले प्रयत्न असा सारा प्रवास सिनेमा विस्ताराने दाखवतो. इंग्रजांना शरण न जाता ताठ मानेने मातृभूमीच्या रक्षणासाठी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी दिलेले बलिदान हा या सिनेमाचा परमोच्च बिंदू. त्यातील धीरगंभीरता पडद्यावरच पाहायला हवी.

सुरुवातीपासून शेवटाकडे जाताना सिनेमाचा प्रवास मात्र काहीसा वर-खाली होतो. मध्यंतरापर्यंत तो काहीसा संथ आहे. मणकर्णिकेचे लग्न, पतीसोबतचे क्षण या सार्‍या गोष्टी दाखवताना सिनेमा रेंगाळतो. काही अनावश्यक गाण्यांमुळे त्याचा टेम्पोही जातो. मेलोड्रामाचाही सोयीने वापर केला जातो. लोकहितासाठी झटणासाठी आणि प्रजेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोकराज्यात जाऊन थेट प्रजेसोबत एकदम अ‍ॅग्रेसिव्ह डान्स करणार्‍या झाशीच्या राणी दाखवून लेखक-दिग्दर्शकाने काय साध्य केले, हा प्रश्‍न छळत राहतो. (प्रसंगी ही राणी बाहुबलीसारखी थेट हत्तीच्या गंडस्थळावरही झेप घेते.) झाशी साम्राज्यातील अंतर्गत कलहाचे केवळ संदर्भ येत राहतात. 1857 चा लढा, त्या वेळी इंग्रजांशी दोन हात करताना आलेल्या अडचणी यांबद्दल सिनेमा विस्ताराने सांगत नाही. झाशीच्या राणीला विरोध करणार्‍या इंग्रज अधिकार्‍यांच्या व्यक्तिरेखाही अतिशय बालीश वाटतात. सिनेमा सजीव करण्यासाठी, तो काळ जिवंत करण्यासाठी वापण्यात आलेले व्हीएफएक्स यामुळे सिनेमाचा आत्मा मात्र हरवतो. सिनेमातील भव्यदिव्यता, इंग्रजविरोधी लढाया यांसाठी वापरलेले तंत्रज्ञान नजरेत भरण्यापेक्षा कृत्रिमतेकडेच जास्त झुकते. भव्यदिव्य राजवाडे, दिव्यांनी उजळलेले महाल पाहताना बाजीराव मस्तानी, पद्मावत, बाहुबली यासारखे सिनेमे आठवत राहतात. अनेक वेळा सिनेमाची भव्यदिव्यता डोळे दिपवून टाकतेही. मात्र, भव्यदिव्यता हा सिनेमा सशक्त होण्याचा निकष असू शकत नाही. झाशीच्या राणीचे चरित्र रंगवत असताना के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी केलेली पटकथेची काहीशी ढिसाळ मांडणी, व्यक्तिरेखांची संदिग्धता सिनेमाचा एकत्रित प्रभाव काहीसा कमी करते. सिनेमाचा शेवटही झाशीच्या राणीचा प्रत्यक्षातील शेवटापेक्षा वेगळा दाखवला जातो. अर्थात हा सारा डोलारा कंगना रनोट तिच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तोलून धरते. दिग्दर्शक आणि अभिनेत्री अशा दोन्ही भूमिका ती साकारते. तिच्यासोबत सहदिग्दर्शक म्हणून राधाकृष्ण जगरलामुदी यांनी काम केले आहे. मात्र, दिग्दर्शनाच्या पातळीवर सिनेमाचा ट्रॅक सातत्याने बदलत राहतो. प्रसून जोशी यांचे संवाद एकदम टोकदार आहेत. सुरेश ओबेरॉय, अतुल कुलकर्णी, डॅनी, वैभव तत्त्ववादी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय देतात. शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत श्रवणीय, पीरियॉडिक आहे. मात्र, सिनेमात वारंवार येणारी गाणी सिनेमाच्या वास्तववादी विषयाशी फारकत घेत असल्याने ती खटकतात. मै रहू या ना रहू भारत ये रहना चाहिये हे गाणं मात्र अप्रतिम झाले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभक्तीचं दर्शन घडवणारा आणि धगधगत्या इतिहासाचं पर्व मांडणारा मणिकर्णिका एकदा पाहण्यासारखा आहेच. सुभद्राकुमारी चौहान यांच्या शब्दात ‘खूब लडी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी’ असं सिनेमाचं वर्णन करावं लागेल. सिनेमॅटिक लिबर्टीचा अट्टाहास टाळला असता तर हा मणकर्णिका प्रेक्षकांच्याही मनाला भिडणारा ठरला असता हे निश्‍चित.

No comments

Powered by Blogger.