बाजार समित्यांच्या सभापतींच्या भत्त्यात वाढ

सातारा : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती आणि उपसभापतींच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदस्यांचा बैठक बत्त व दैनंदिन भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. याचा लाभ सातारा, कराड, फलटण, लोणंद या बाजारसमित्यांना अधिक होणार आहे.

राज्यात 307 कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या उत्पन्नानुसार अ, ब, क, ड वर्ग निश्‍चित करून सभापतींना दरमहा अडीच ते हजार रूपयांचे मानधन देण्यात येणार आहे. त्यानुसार सातारा बाजार समितीच्या सभापतींना 10 हजार रूपये तर उपसभापतींना पाच हजार रूपये मानधन मिळणार आहे.

इतर संस्थांच्या सदस्यांचे मानधन, प्रवास भत्ता व दैनिक भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली होती. इतर संस्थांच्या तुलनेत बाजार समिती पदाधिकार्यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती.

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, प्रवास भाडे, पेट्रोल-डिझेलचे वाढत असलेले दर इत्यादी बाबींचा विचार करता हे सुधारित दर मंजूर करण्यात आल्याचे बाजार समित्यांना कळवण्यात आले आहे.

दरम्यान, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्या समित्यांनी त्यांचे आर्थिक नियोजन करून बाजार समित्यांचे उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ घालून खर्चावर नियंत्रण ठेवावे. त्यांना सुधारित दर देणे परवडणारे नसल्यास दि. 5 ऑगस्ट 2008 च्या पत्रात नमूद केलेल्या दरानुसार भत्ते अदा करावेत. एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सभा असल्यास त्या सदस्यास एकाच बैठकीचा भत्ता देय राहिल. याबाबत वाढीव खर्चासाठी शासन कोणताही वाटा, आर्थिक भार उचलणार नाही व कोणतीही आर्थिक मदत मिळणार नसल्याचेही परिपत्रकात नमूद केले आहे.

No comments

Powered by Blogger.