Your Own Digital Platform

युतीसाठी सेना राजी; दोन दिवसांमध्ये होणार शिक्कामोर्तब

मुंबई : भाजपच्या अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर शिवसेना युतीसाठी राजी झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका हे पक्ष एकत्रित लढणार आहेत. लोकसभेसाठी भाजप 25 आणि शिवसेना 23 जागांवर लढेल, तर विधानसभेच्या निम्म्या निम्म्या जागा, म्हणजे 144 जागा दोघेही लढवतील. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री होईल. या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यामुळे आता मोठा-छोटा भाऊ असे काही राहिलेले नाही, दोघेही जुळे भाऊ झालो आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. येत्या दोन दिवसांत युतीबद्दलची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून सतत अत्यंत जहरी टीका होत असतानाही त्यावर भाजपकडून फारशी तीव्र प्रतिक्रिया दिली जात नव्हती. सतत स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना नेते करीत असले तरी युती होणारच, असा विश्वास भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त होत होता. शिवसेनेने मात्र युती आमच्याच अटींवर झाली पाहिजे, असे भाजपच्या नेत्यांना बजावले होते. गेल्यावेळी भाजपकडून फसवणूक झाल्याची भावना असल्याने यावेळी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांसाठीचे जागावाटप आधीच करा, असा आग्रह शिवसेनेकडून धरला गेला होता. शिवाय राज्यात मोठ्या भावाची भूमिका आमच्याचकडे असल्याने विधानसभेच्याही जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. त्या 1995 च्या सूत्रानुसार व्हाव्यात, अशी मागणी सेना नेत्यांनी केली होती. भाजपने यास स्पष्टपणे नकार देताना आता परिस्थिती बदलली असून, आम्ही कमी जागांवर लढणार नाही, असे सांगून टाकले होते.

पालघर शिवसेनेला, मावळसाठी भाजप आग्रही?

दरम्यान, शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी आग्रह धरला होता. सेनेचा हा आग्रहदेखील भाजपने मान्य केल्याचे समजते. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर इथली पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करून भाजपने जिंकली होती. श्रीरंग बारणे खासदार असलेला मावळ हा शिवसेनेकडील मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आल्याचे समजते. मात्र, युती होणार हे तत्त्वतः मान्य झाल्यानंतर तपशीलवार बोलणी होतील, असे सांगण्यात आले.

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीत भाजपचेच वर्चस्व असल्याने 1995 च्या सूत्रानुसार विधानसभेचे जागावाटप नाही, अशी भूमिका भाजपची होती. त्यामुळे युतीचा तिढा सुटायला तयार नव्हता. त्यातच भाजपचे केंद्रीय नेते आता युतीच्या बोलणीसाठी ‘मातोश्री’वर जाणार नाहीत, अशी भूमिका भाजपश्रेष्ठींनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करावा, त्यास आम्ही मंजुरी देऊ, असा निरोप दिल्लीतून आला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित होते.मात्र, पुलवामा येथील पाकिस्तानी हल्ल्याची पार्श्वभूमी असल्याने या भेटीत दोन्ही नेत्यांचे फारसे काही बोलणे झाले नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.