‘पबजी’च्या हट्टापायी मुंबईत तरुणाची आत्महत्या

मुंबई: पबजी खेळण्यासाठी नवीन मोबाइल घेऊन न दिल्याने मुंबईतील एका 19 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नदीम शेख (19)असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचं नाव आहे.

नदीम शेख हा कुर्ल्यातील नेहरु नगर परिसरात त्याची आई, भाऊ आणि भावाची पत्नी व भावाच्या मुलीसह वास्तव्यास होता. नदीम हा त्याच्या भावाकडे महागडा मोबाइल मागत होता. त्यासाठी नदीम शेखने भावाकडे 37 हजार रुपयांची मागणी केली. गुरूवारी रात्री यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि अखेर भावाने त्याला 20 हजार रुपये द्यायची तयारी दर्शवली. पण मला पूर्ण रक्कम हवी व तोच मोबाइल हवाय असा हट्ट धरत नदीमने ते पैसे नाकारले.

या घटनेनंतर रात्री दोन वाजेच्या सुमारास कुटुंबीय झोपायला गेले पण नदीम गेम खेळत होता. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा भाऊ शौचालयाला जाण्यासाठी उठला असता किचनमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने लटकून नदीमने आत्महत्या केल्याचं त्याला दिसलं. नदीमच्या भावानं नेहरूनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

No comments

Powered by Blogger.