लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवारांचा श्रीमंत संजीवराजेंना हात

माळेगावच्या कार्यक्रमात उपस्थितांचे डोळे विस्फारले; लोकसभेसाठी हालचाली सुरु?

सातारा (चैतन्य रुद्रभटे
): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादीचे सुप्रिमो, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी माळेगाव (ता. बारामती) येथील तावरे सिटीज्च्या भुमिपूजन प्रसंगी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात हात दिला. या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्यासह पुणे जिल्ह्यातील व बारामती तालुक्यातील दिग्गजांची उपस्थिती होती. शरद पवारांनी श्रीमंत संजीवराजे यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यामुळे उपस्थितांचे मात्र डोळे विस्फारलेले दिसले. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे लोकसभेसाठी या दोहोंच्या काहीतरी हालचाली सुुरु आहेत, असे म्हणत कार्यक्रमस्थळी अनेकांनी चुळबूळ केली.

लोकसभेचे पडघम वाजू लागले

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणुक आली आहे. देशातील व राज्यातील भाजपाचे सरकार उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. अधिकाधिक खासदार देशावर निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे सुप्रिमो व केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांचे प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षांतर्गत इच्छूक उमेदवारांच्या हालचाली वाढल्या आहेत.

सातार्‍याचा प्रश्‍न मिटला?
सातारा लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादीतून उमेदवारी निश्‍चितच मानली जात आहे. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्यातील असलेले राजकीय वैमनस्य मिटवण्यात शरद पवारांना यश आल्याचे मानले जात आहे.

दोन लोकसभा मतदार संघातून
संभाव्य उमेदवारांमध्ये फलटणकर


मात्र, यापूर्वी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना पर्याय म्हणून सातारा लोकसभा मतदार संघातून ना. श्रीमंत रामराजेंना किंवा श्रीमंत संजीवराजेंना उमेदवारी द्या, अशी मागणी जोर धरु लागली होती. याखेरीज माढा लोकसभा मतदार संघातून सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारावर राष्ट्रवादीचे एकमत होत नसेल तर फलटण, माण व खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीतून ना. श्रीमंत रामराजे किंवा श्रीमंत संजीवराजे यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी होत आहे. त्यामुळे निश्‍चितच फलटणकरांच्या राजकीय वजनाची कल्पना शरद पवारांना आली असावी.

माळेगाव येथे पवारांनी दिला
श्रीमंत संजीवराजेंना हात


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत ना. श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे या दोहोंची नावे माढा व सातारा लोकसभा मतदार संघातून पुढे येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर काल माळेगाव (ता. बारामती) येथील व्हीएनसच्या तावरे सिटीज् या भव्य प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित केलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी फलटणकरांना चांगलाच मान दिला. व्यासपिठावर जात असताना पवारांच्या नजरेस श्रीमंत संजीवराजे यांना घेवून पवार व्यासपिठावर विराजमान झाले. व्यासपिठावर आल्यानंतर पवारांनी श्रीमंत संजीवराजेंचा हात धरुन त्यांच्या म्हणजेच पवारांच्या शेजारी बसण्यासाठी नेले. आणि चर्चा करत बसले.

पवारांच्या तोंडी सुप्रिया सुळेंच्या आधी संजीवराजे
एवढेच नव्हे या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. आपले मार्गदर्शन सुरु करण्याआधी पवारांनी या बाकिच्यांचे नाव सोडून उपस्थित मान्यवरांपैकी पहिले नाव श्रीमंत संजीवराजे यांचे घेतले.

कार्यक्रम संपल्यावर मान्यवरांची चुळबूळ

नेमकं पवारांच्या मनात काय दडलयं? पवारांनी श्रीमंत संजीवराजेंना एवढ जवळ का घेतले? पवारांची आणि श्रीमंत संजीवराजेंची काय चर्चा झाली? या प्रश्‍नाची उत्तरे खुद्द पवार सोडून इतर कोणालाही माहित नसावीत. पण, काल घडलेल्या प्रकाराने अनेकांचे डोळे विस्फारलेले आहेत. काहीतरी चाललयं एवढ नक्की, अशी चुळबूळ कार्यक्रम संपल्यावर इतर उपस्थित मान्यवरांनी केली, हे जरी खर असल तरी नेमकं चाललयं काय? हे मात्र कोणालाच माहित नाही.

ना. श्रीमंत रामराजे न जाण्याचा
आणखी एक ट्विस्ट


या कार्यक्रमातील आणखी एक ट्विस्ट म्हणजे तावरे सिटीज् या प्रकल्पाचा भुमिपूजन समारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते व ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता. काल दिवसभर ना. श्रीमंत रामराजे फलटणमध्येच होते. तरीही बारामतीला ते का गेले नाहीत? याचेही कारण समजू शकले नाही. सभागृहात आपण सभापती म्हणून असलो तरीही सभागृहाबाहेर व विधान भवनाबाहेर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकता म्हणूनच राहणार आहे, असे ना. श्रीमंत रामराजेंनी अनेकदा भाषणात सांगितले होते. पण, अलिकडे पक्षाच्या कार्यक्रमाला जाणे ना. श्रीमंत रामराजे टाळत आहेत. ते कशामुळे टाळत आहेत? याचे उत्तररी अद्याप कोणालाच मिळालेले नाही. पण, वरिष्ठ पातळीवर काहीतरी हालचाली चालल्या आहेत. भविष्यात या हालचालींची उत्तरे आपल्याला मिळतील.

No comments

Powered by Blogger.