Your Own Digital Platform

संधी दिल्यास मावळमधून लढण्यास तयार : पार्थ पवार

स्थैर्य, पुणे: जर पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी दिली तर मी मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी म्हटले आहे. मावळ मतदारसंघाचा भाग असलेला पिंपरी-चिंचवड आणि मावळ भागात अजित पवारांना मोठे पाठबळ आहे. ही सर्व ताकद पार्थ यांच्यासाठी कामी येऊ शकते.

पवारांच्या तिसर्‍या पिढीतील पार्थ म्हणाले, राज्यापेक्षा आपल्याला केंद्रातील राजकारणात जास्त रस आहे. केंद्रात गेल्यास आपल्यासाठी हा राष्ट्रीय मुद्द्यांवर काम करण्यासाठी मोठा परिघ उपलब्ध असेल. 28 वर्षीय पार्थ यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली.

तसेच जर पक्षाने यंदाच्या निवडणुकीसाठी इतर दुसर्‍या कार्यकर्त्याला मावळमधून उमेदवारी दिल्यास आपण 2024 च्या निवडणुकीपर्यंत थांबायला तयार आहोत. त्यावेळी वयही आपल्या बाजूने असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या लोकांना आपल्या भागाचा बारामतीसारखा विकास व्हावा असे वाटत असल्याने आपण मावळमधून निवडणूक लढवावी असा इथल्या जनतेचा आग्रह आहे, म्हणून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या आमच्या कामाचे श्रेय इथला सत्ताधारी भाजपा घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पार्थने मुंबईच्या एचआर कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे.

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे मावळचे खासदार म्हणून निवडूण आले तर राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर हे तिसर्‍या स्थानावर होते.