Your Own Digital Platform

जलसिंचन कर्मचारी उद्यापासून संपावर
सातारा : महाराष्ट्र राज्य जलसिंचन विभागाचा कणा असलेल्या दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक यांना एकत्रित करून सिंचन सहाय्यक पद निर्मिती करावी, त्या पदांना वेतन आयोगातील 2400 ग्रेड पे प्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील सुमारे 2500 कर्मचारी 4 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जात असल्याची माहिती सातारा जिल्हाध्यक्ष सुशांत बाबर यांनी दिली.

दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक हे जलसंपदा विभागातील ओलिताखाली येणार्‍या जमिनी आणि शेतकर्‍यांकडे पाणीपट्टी वसुलीचे महत्त्वपूर्ण काम करण्याचे जबाबदारीचे काम करत असतात. या पदावर सातत्याने शासनाकडून अन्याय होत असल्याने याबाबत संघटनेने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने या संदर्भात कर्मचार्‍यांच्या बाजूने निकाल देऊन तीन महिन्यात निर्णय घेण्याच्या अटीवर याचिका निकाली काढण्याचे आदेश दिल्याचे बाबर यांनी सांगितले. सहाव्या वेतन आयोगात तलाठी ग्रामसेवक इत्यादी संवर्गांना 1900 ग्रेड पे वाढवून तो 2400 करण्यात आला मात्र शासनाने जलसंपदा विभागाच्या या तिन्ही पदांना 1900 ग्रेड पे ठेवून अन्याय केला आहे.

या तिन्ही पदांना कायमस्वरूपी फिरतीचे काम असून सुद्धा प्रवास भत्ता शासनाकडून दिला जात नसल्याने पदरमोड करून वसुलीचे, मोजणीचे काम करावे लागत आहे. यासाठी दरमहा 3000/- प्रवास भत्ता देण्यात यावा. या कामासाठी सद्यस्थितीत चार हजार कर्मचारी असले तरी 70 टक्के कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याने कर्मचार्‍यांवर कामाचा बोजा पडत असून त्याचा परिणाम वसुलीवर पडत आहे.

दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक ही वेगवेगळी पदे असली तरी प्रत्यक्षात काम मात्र एकच करत असल्याने सिंचन सहायक संवर्ग निर्माण करून त्यांना 2400 ग्रेड पे प्रमाणे वेतन लागू करावे. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे.