Your Own Digital Platform

माळेगाव कारखाना एफआरपीप्रमाणे दर देणार:तावरे

फलटण:माळेगाव सहकारी साखर कारखाना लि., शिवनगर (माळेगाव बु॥), ता. बारामती या साखर करखान्याने यावर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसापैकी दि. 31 जानेवारी अखेर गाळपास आलेल्या 4 लाख 89 हजार 303 मे. टन ऊसाला प्रती टन 2215 रुपयाप्रमाणे 108 कोटी 38 लाख 6 हजार 145 रुपयांचे पेमेंट ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केले असून एफ आर पी प्रमाणे प्रती टन 2746.51 रुपये द्यावयाचे असल्याने प्रती टन 531.51 रुपयांचे पेमेंट लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक चंदरराव तावरे आणि विद्यमान चेअरमन रंजन तावरे यांनी दिली आहे.

कारखान्याने यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत 6 लाख 24 हजार 460 मे. टन ऊसाचे गाळप करुन 6 लाख 89 हजार साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. 11.23 % साखर उतारा पडला आहे. यावर्षीच्या हंगामात 10 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासद आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व शेजारच्या तालुक्यातील गेटकेन दोन्ही ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी माळेगाव कारखान्याकडे पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे यांनी केले आहे. संपूर्ण ऊसाचे गाळप करुन रास्त ऊस दराची परंपरा कारखाना यावर्षीही जपणार असल्याचे यावेळी चेअरमन तावरे यांनी स्पष्ट केले.