Your Own Digital Platform

बारामतीत भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात

बारामती: भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी निवडणुकीत घराचा रस्ता दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे गुगली’चा प्रयोग करीत आहेत. त्यासाठी त्यांनी विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या काही प्रमाणात यशही आले आहे. तर पंतप्रधान होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते खासदारकीसाठी सज्ज झाले असून ते माढातून लढणार ही घोषणा करण्याचे केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यातच शरद पवार यांची गुगली’ त्याच्यावरच उलटवणासाठी भाजपचे गेमचेंजर’ अमित शहा हे कामाला लागेले असून यंदा बारामती लोकसभेचा गड काबीज करण्यासाठी त्यांनी शड्डू’ ठोकले आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पूर्णपणे सपोर्ट’ केला असून त्यादृष्टीने व्यूहरचनाही आखली आहे. मात्र, या मतदारसंघात पवारांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांना रोखण्यासाठी सक्षम उमेदवारांच्या शोधात भाजप असून त्यांना तो मिळणार की नाही हे आगामी काळात कळेलच.

राष्ट्रवादीच्या हातून पर्यायाने शरद पवारांच्या हातून बारामतीची सत्ता मिळविणे सध्या तरी अशक्यच आहे. 1984च्या निवडणुकीपासून बारामती लोकसभा मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. 1989 आणि 1994चा अपवाद वगळता इथून पवारांशिवाय इतर कोणी निवडून आलं नाही. अजित पवारही 1991मध्ये या मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र त्याचवर्षी झालेल्या पोट निवडणुकीपासून 2004च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी बारामतीचे प्रतिनिधित्व केले. तर 2004पासून हा मतदारसंघ पवारांनी कन्या सुप्रिया सुळेंकडे सोपविला आहे. दरम्यान, या मतदारसंघाला पर्यायाने पवारांच्या या अभेद्य बालेकिल्ल्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. त्यांचा वाढलेला एवढा आत्मविश्वास म्हणजेच गेल्या वेळची निवडणूक होय. 2014मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेंना मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी देशभरात उसळलेली मोदी लाट, धनगर आरक्षणासाठीचे आंदोलन तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मिळालेली साथ जानकरांच्या पथ्यावर पडली.

मागील निवडणुकी वेळची आणि आत्ताची परिस्थिती बदलली आहे. हे लक्षात घ्यावे लागणार आहे. गेल्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्‍या सहा विधानसभा मतदार संघांपैकी तीन ठिकाणी जानकरांना आघडी मिळाली होती. खरे तर बारामती विधानसभा मतदार संघातून सुप्रिया सुळेंना लीड मिळाल्याने त्यांचा विजय तरला असंच म्हणावे लागेल. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाचे सहापैकी दोनच आमदार निवडून आले होते. याच आत्मविश्वासावर अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी शड्डू ठोकले आहेत; मात्र हा आत्मविश्वास अहंकार ठरू नये, अन्यथा तोंडावर पडण्याची वेळ भाजपवर आल्याशिवाय राहणार नाही.

राष्ट्रवादीला घराणेशाही नडणार?

राज्यात गेमचेंजर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मानणारा मोठा समूह असल्याने छोट्या छोट्या गावातही त्यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहे. तसेच कार्यकर्त्यांना कायम पदे देण्याबाबत आणि मोठे करण्यामागे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा मोठा हात आहे. मात्र, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर माढ्यातून खुद्द शरद पवार, बारामतीतून सुप्रिया सुळे व मावळमधून पार्थ पवार यांची नावे फिक्स’ झाल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. मात्र, येथील जुन्या जाणत्या आणि विश्वासू कार्यकर्त्यांना वगळून पवार कुटुंबातील व्यक्तींना तिकीट दिल्याने विरोधक याचा प्रचारात उपयोग करणार यात कोणाचेही दुमत नाही. त्यामुळे घराणेशाही राष्ट्रवादीला नडणार असा जाणकारांचा अंदाज आहे.

जानकर बळीचा बकरा बनणार?

बारामतीत कमळ फुलवणार असल्याची गर्जना होत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जोश भरल्या गेला आहे. गतवेळच्या निवडणुकीसाठी तर स्वतः नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतली होती. या निवडणुकीत सुळे यांना जानकरांनी जोरदार टक्कर दिली होती. जानकर हे भाजपचे मित्र पक्षाचे असून ते कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवितात. मात्र, आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावरच लढविणार असल्याचे जगजाहीर केले आहे, त्यामुळे जानकर यांचे तिकीट कापून त्यांना आमदारकीचा बकरा भाजप बनवणार की त्यांनाच कमळ’ चिन्हावर निवडणुकीसाठी तयार करणार? हे आगामी काळ ठरवेलच. जर जानकर यांचे खासदारकीचे तिकीट कापलेच तर मग या मतदारसंघात सुळेंविरोधात भाजपकडून कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.