Your Own Digital Platform

पवारसाहेब, तुम्ही फक्त लढ म्हणा: संजीवराजे


माढ्यासाठी संजीवराजे इच्छुक

सातारा: माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनी आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी इच्छा आहे. मात्र, त्याचबरोबर आपल्याला उमेदवारी न मिळाल्यास आपण नाराज होणार नाही. पक्ष देईल ती जबाबदारी स्विकारण्यास आपण तयार आहोत, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. म्हणजेच पवारसाहेब, आता तुम्ही फक्त लढ म्हणा, असेच श्रीमंत संजीवराजे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

सातारा येथे मानिनी जत्रेच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे दिलखुलासपणे बोलत होते.

माळेगाव ता.बारामती येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासोबत प्रसिध्द झालेल्या छायाचित्रानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माढा मतदारसंघातून लढण्याच्या चर्चांचा जोर वाढला होता.

याबाबत बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. मात्र ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे पवार साहेबांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यास सांगितले. तसेच त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघा विषयी कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ ऊस दराच्या प्रश्‍नाची माहिती पवार साहेबांनी त्यावेळी घेतली, असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघातून जबाबदारी दिली तर आपली स्वीकारायची तयारी आहे, असे सांगून ते म्हणाले, माझ्या व्यतिरिक्त जरी इतरांना उमेदवारी दिली तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून निवडून आणणार आहोत. तसेच मागील लोकसभा निवडणूकीत असलेल्या लाटेमुळे फलटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्क्य मिळू शकले नाही. परंतु या निवडणूकीत तशी संधी विरोधकांना मिळणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. नुकतेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात राष्ट्रवादीची सत्तास्थाने असलेल्या जिल्हा परिषद व जिल्हा बँक ताब्यात घेण्याची घोषणा करण्यात आली असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, ए संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, अद्याप त्या निवडणूका लांब आहेत. तुर्त आगामी निवडणूकांवर चर्चा करू असे सांगून विषयाला बगल दिली.