Your Own Digital Platform

पाकिस्तानी गायकांची गाणी बंद करा, अन्यथा ‘सर्जिकल स्ट्राइक’, मनसेचा एफएम वाहिन्यांना इशारा
मुंबई: जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना विरोध दर्शवला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका कधी उडेल, काही सांगता येत नाही. अशा स्फोटक वातावरणात आपल्या रेडिओ वाहिन्या मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यासारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी भारतीयांना ऐकवत आहेत. पाकिस्तानी गायक- संगीतकारांची गाणी थांबवा अन्यथा गाणी बंद करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक’ कसा करायचा, हे मनसेला ठाऊक आहेच, असा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी एफएम रेडिओ वाहिन्यांना दिला आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकार आणि गायकांविरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसेने आता एफएम वाहिन्यांवरील पाकिस्तानी गायकांच्या गाण्यांवर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात शालिनी ठाकरे यांनी मंगळवारी भूमिका स्पष्ट करत सर्व एफएम वाहिन्यांना पत्र पाठवले आहे. यात त्या म्हणतात, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा सूड घेण्यासाठी एक देश म्हणून आपण सर्व भारतीय वचनबद्ध असताना आपल्या लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर मात्र अत्यंत निर्लज्जपणे पाकिस्तानी गायक -संगीतकारांची गाणी वाजवली जात आहेत. पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र आपल्या देशाविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत असताना, भारत-पाक सीमेवर अत्यंत तणावाचं वातावरण असताना तसेच या दोन देशांमध्ये कधीही युद्धाचा भडका उडेल अशी नाजूक स्थिती असताना आपली रेडिओ वाहिनी मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी करोडो भारतीयांना ऐकवत आहे. संगीत ऐकणा-याच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते हे खरं असलं तरी सध्याच्या संवेदनशील स्थितीत पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी मात्र देशवासीयांच्या मनात संतापाची भावना निर्माण करत आहेत. म्हणूनच रेडिओ वाहिन्यांवर पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी वाजवली जाऊ नयेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

दरवेळी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच पाकिस्तानी कलाकारांना विरोध करायचा? या रेडिओ वाहिन्यांमध्ये जे लोक काम करतात किंवा इथल्या कार्यक्रमांचं शेड्यूल जे आखतात, त्यांना देशवासीयांची भावना काय आहे, याची काहीच जाणीव नाही का ?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

रेडिओ वाहिनीच्या कोट्यवधी श्रोत्यांच्या पाकिस्तानबाबतच्या संतप्त भावना लक्षात घेऊन आपण पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी आपल्या रेडिओ वाहिनीवर वाजवणं तत्काळ थांबवावे, असे शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे. भारतीयांच्या भावनांचा आपण आदर कराल याची खात्री आहेच, अन्यथा आपल्या रेडिओ वाहिनीवरून वाजवली जाणारी पाकिस्तानी गाणी बंद करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक’ कसा करायचा, हे मनसेला ठाऊक आहेच, असा इशाराच त्यांनी दिला आहे.