Your Own Digital Platform

वीरशैव लिंगायत समाजाच्या अडचणी सोडवण्यास नेहमीच प्राधान्य


आ. शिवेंद्रसिंहाराजे; समाजाच्या मठासाठी 50 हजाराची केली मदत

स्थैर्य, सातारा
: मानवताधर्म जोपासत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. कधीही जातीभेद, धर्मपंथ न मानणार्‍या छ. शिवरायांच्या पवित्र घराण्यात माझा जन्म झाला. हे माझे भाग्यच आहे. छ. शिवरायांच्या विचारसरणीनुसार दिलेला शब्द पाळणे आणि तळागाळातील समाजासाठी अविरत काम करणे, हेच माझे कर्तव्य असून वीरशैव लिंगायत समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यंनी केले.

येथील बुधवार पेठेतील औंधकर महाराज मठात वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळाला 50 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. लिंगायत समाजाच्या औंधकर महाराज मठासाठी स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांनी आर्थिक मदत करण्याचा शब्द दिला होता. मात्र भाऊसाहेब महाराजांचे अकाली निधन झाले. दरम्यान, या मठाच्या जिर्णोध्दाराचे काम सुरु असून या मठासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी 50 हजार रुपयांची देणगी देवून स्व. भाऊसाहेब महाराजांचा शब्द पाळला. देणगीचा धनादेश आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकला वांकर, उपाध्यक्षा सौ. निर्मला बारवडे, सौ. महादेवी तोडकर, सौ. नंदा चिंचकर, सौ. लक्ष्मी कामळे यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला. यावेळी महादेव शिवाचार्य वायकर महाराज, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष जगन्नाथ गवळी (सावकार), रघुनाथ राजमाने, श्रीनिवास कामळे, भारत बारवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे आणि महादेव शिवाचार्य वायकर महाराज यांच्या हस्ते समाजाच्या अक्कमहादेवी शिवशरणी सभागृहाचे लोकापर्ण यावेळी करण्यात आले. स्व. भाऊसाहेब महाराजांनी सर्वधर्मसमभाव मानून सर्वस्तरातील लोकांच्या उन्नतीसाठी काम केले. त्यांच्या पश्‍चात ही जबाबदारी माझ्यावर आणि आणि स्व. भाऊसाहेब महाराजांच्या आशिर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे ही जबाबदारी पेलण्याचे काम मी करत आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांनी लिंगायत समाजाच्या मठासाठी मदत करण्याचा शब्द दिला होता. याबाबत या समाजाच्या महिला भजनी मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मला सांगितले आणि मठासाठी आर्थिक मदत करुन भाऊसाहेब महाराजांचा शब्द पाळला. सर्वच समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी आपण नेहमीच कार्यरत राहणार आहे. लिंगायत समाजाच्या समस्या सोडवण्यासाठीही आपण नेहमीच मदत करु, अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी दिली.