आंदोलन आणि निवडणुका

पावसाळा सुरू झाल्यावर भूछत्र किंवा कुत्र्याच्या छत्र्या उगवतात. तसाच प्रकार निवडणुकीच्या तोंडावर काही दुकाने सुरू होतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे अण्णा हजारेंचे उपोषण. गेल्या काही वर्षापासून वार्षिक जत्रा किंवा नवरात्र असावे त्याप्रमाणे काही ना काही कारणाने उपोषण सुरू करायचे आणि आपले महत्त्व वाढवून घ्यायचे याचा नादच अण्णा हजारेंना लागलेला आहे. आताही गेल्या आठवडयापासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि सरकारला नमवायचा प्रयत्न केला आहे. अर्थात अण्णांच्या आंदोलनाला ना आता पूर्वीची धार आहे, ना लोकांना त्यांच्याबद्दल आत्मीयता राहिलेली आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी आपल्याकडे म्हण आहे. तशी सतत भुणभुण करणा-या आणि किरकि-या म्हाता-याला जशी घरातली माणसे कंटाळतात आणि दुर्लक्ष करतात तशीच आता अण्णा हजारेंची अवस्था झालेली आहे. आपल्याकडे कोणीच आता त्यांची फार दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे अण्णा हजारेंचे पित्त खवळताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांना मी कसा नमवू शकतो, सरकार माझ्यापुढे कसे गुडघे टेकते आहे, हे दाखवण्यात त्यांना अधिक रस आहे.

विशेष म्हणजे अण्णांची ही आंदोलनाची नाटके निवडणुकीच्या तोंडावर सुरू होतात. म्हणजे कोणी विरोधक सरकारविरोधात सुपारी देऊन अण्णांचा हा इव्हेंट ऑर्गनाईज करते की काय असा प्रश्‍न पडतो. सरकारविरोधात हवा तयार करण्याची मी सुपारी घेत असल्याचे अण्णा हजारे दाखवून देत असतात. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनात कितपत खरेपणा आहे हे दिसून येते. अण्णांनी नुकतेच एक विधान या आंदोलनाच्या दरम्यान केले होते. ते म्हणजे, जनतेचा विरोध पत्करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहेत, असे मी म्हटले होते. त्यांना अनेक वेळा सांगून पाहिले; परंतु एका वर्षात लोकायुक्तांची नेमणूक होऊ शकली नाही. त्यामुळे ते माझ्या मनातून उतरले आहेत. कोणाच्याही सभ्यतेची, सुसंस्कृतपणाचे प्रमाणपत्र अण्णांनी दिल्यावर तो उमेदवार, नेता पवित्र होतो असे अण्णांना वाटते. अण्णांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या सुमारास असे महाराष्ट्रभर फिरत असतात. आम्हाला पाच लाख रुपये द्या म्हणजे हा नेता भ्रष्ट नाही, असे अण्णांच्या सहीचे पत्र देतो, असे बिनदिक्कतपणे दुकानदारी करत अण्णांचे कार्यकर्ते फिरत असतात. विशेष म्हणजे एखाद्या उमेदवाराने त्याला नकार दिला की ते कार्यकर्ते विरोधी उमेदवाराकडे जातात.

अण्णांच्या आंदोलनाचा फायदा 2014 ला भाजपला झाला, असा दावा अण्णा करत असले तरी त्यात फारसे तत्थ नाही. अण्णांच्या आंदोलनाचा फायदा उठवला तो अरविंद केजरीवाल यांनी. आम आदमी पार्टीच्या माध्यमातून तो त्यांनी लाभ उठवला. तेव्हा आपल्या हातात काहीच लागले नाही म्हणून आता अण्णा ओरडत आहेत, हे वास्तव आहे. केजरीवाल यांना अण्णांमुळे ओळख मिळाली. पण तेच केजरीवाल आता अण्णांना टाळत आहेत. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीस भेट देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र ठोस प्रस्ताव असेल तरच या, केवळ चर्चा करण्यात अर्थ नाही, असे आपण त्यांना कळवल्याचेही अण्णा हजारेंनी सांगून टाकले. ज्या माणसाचा लोकशाहीच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास नाही आणि अण्णांनी सांगितल्याबरोबर लगेच झाले पाहिजे या हुकूमशाही प्रवृत्तीला खतपाणी घातले जाते त्याला कितपत महत्त्व द्यायचे हे लक्षात घेतले पाहिजे. अण्णांना जर खरोखरच आंदोलन करायचे होते, तर त्यांनी गेल्या चार वर्षात ही मागणी का केली नाही आणि निवडणुका आल्यावरच त्यांना का हे सुचते आहे हा खरा प्रश्‍न आहे.

No comments

Powered by Blogger.