Your Own Digital Platform

खंडणीसाठी डॉ. राउत यांचे अपहरण; पोलिसांच्या चांगल्या कामगिरीने सुटका

फलटण : 5 कोटी रुपये खंडणीसाठी अपहरण केलेल्या येथील प्रख्यात ह्रदयरोग तज्ञ डॉ. संजय राऊत यांची पुणे ग्रामीण व सातारा पोलिस दलाच्या संयुक्त कारवाईत सुटका करुन तिघा संशयितांना फलटण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी फलटण येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना, डॉ. संजय राऊत यांना 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अज्ञातांनी मंगळवार दि. 19 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास लाइफ लाइन हॉस्पिटल येथून रामराजेनगर येथील निवासस्थानाकडे (होंडा शाईन) दुचाकीवरुन जाताना जबरदस्तीने स्वीफट कारमध्ये (चक-11-इग-5518) बसवून त्यांचे अपहरण केले, दरम्यान या संशयितांनी गाडीतून डॉ. संजय राऊत यांच्या मोबाइलवरुन डॉ. राऊत यांच्या सिध्दनाथ हॉस्पिटलचे व्यवस्थापक प्रशांत शेलार यांच्याशी संपर्क करुन डॉ. राऊत यांना जमीन खरेदीसाठी 5 कोटी रुपये लगेच लागणार असून त्याची तरतूद करण्याच्या सूचना देण्यास डॉ.राऊत यांना भाग पाडले, त्यानंतर वारंवार फोन करुन पैशाची तरतूद झाली किंवा नाही याची डॉ. राऊत यांना प्रशांत शेलार यांच्याशी बोलून खात्री करण्यास भाग पाडले, मात्र 5 कोटी ऐवजी केवळ 2 कोटी जमा झाल्याचे समजल्यानंतर ते घेऊन बारामती येथे येण्याबाबत डॉ. राऊत यांच्या मार्फत प्रशांत शेलार यांना सूचना देण्यात आल्या.
दरम्यान शेलार व डॉ. राऊत यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करुन घडल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. वृषाली देसाई, ज्ञानेश्वर दळवी, बारामती ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करुन रवाना केली तर सातारा पोलीस मुख्यालय येथे जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख व अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी या पथकांना सतत संपर्कात राहून दिलेल्या सुचना नुसार ही कारवाई पुढे नेत एकूण 7/8 पैकी 3 संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन उर्वरित संशयितांबाबत माहिती घेतली आहे.
डॉ. संजय राऊत यांनी आपला या लोकांशी पूर्वी कधीही संपर्क आला नाही, आपण गेली 25 वर्षे रुग्णसेवा करताना रात्री अपरात्री रुग्णालयात जाऊन उपचार केले असल्याने असा प्रकार कधी घडेल असे वाटले नाही, मात्र हा अनुभव पूर्णतः नवा होता आणि यातून आपली सुटका नाही असे वाटत असताना आपण प्रामाणिकपणे केलेली रुग्णसेवा आणि परमेश्वरावरील विश्वासामुळे आपली यातून सुटका होईल असे वाटत होते, ते प्रत्यक्षात आले त्यामध्ये परमेश्वर कृपेला पोलीस यंत्रणेची साथ लाभल्यानेच आपली सुटका झाल्याचे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी या गुन्ह्यात संशयीत म्हणून इकबाल बाळाभाई शेख वय 35 रा. पदमावतीनगर, कोळकी ता.फलटण, अझहर अफसर शेख वय 24 रा. भडकमकरनगर फलटण, महेश धनंजय पाटील वय 25 रा. कांबळेश्वर, ता. फलटण या तिघांना ताब्यात घेतले आहे, या गुन्ह्यात एकूण 7/8 संशयीत असून त्यांनी डॉ. राऊत यांना त्यांच्या राहत्या घरापासून सोबतच्या दुचाकीसह ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेले होते, तेथे त्यांना मारहाण, दमदाटी करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून केवळ आठ तासात त्या अपहरण करणार्यांच्या मुसक्या आवळून तिघांना ताब्यात घेत डॉ.संजय राऊत यांची सुटका केल्याने व रात्रभर या गुन्ह्यांचा तपास लावण्यात घेतलेल्या मेहनतीबद्दल कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या पथकातील पोलिस अधिकारी/कर्मचारी यांना 35 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. दरम्यान जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनीही या पोलिस अधिकारी/कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.
या प्रकरणी फलटण डॉक्टर्स असोसिएशनची बैठक होऊन पोलीस दलाने घेतलेल्या ठोस भूमिकेबद्दल आणि केलेल्या ठोस कार्यवाहीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या तपासात वालचंदनगर चे पो.उपनिरीक्षक संजय धोत्रे, स्थानिक गुन्हे शाखा साताराचे सहा.पोलिस निरीक्षक जाधव, पोलीस हवालदार दबडे, विलास नामे, पोलीस नाईक मुबीन मुलाणी, पो.कॉ. अनिल खटावकर, पंकज बेचके, शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे नितीन चतुरे, सुजित मेंगावडे, सर्जेराव सुळ, पो.ह.सोनवलकर, दिग्विजय सांडगे, श्रीनाथ कदम, खराडे, लावंड हे सहभागी झाले होते.